आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता विदर्भात संघटन बळकटीवर भर देऊन जनसामान्यांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष द्या असे आवाहनकरीत राज ठाकरे यांनी जवळपास दोन तास जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा तास घेतला.
गेल्या महिन्यात प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरे यांनी नागपूर आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांच्या बैठकी रद्द करून दोन दिवस रविभवनमध्ये आराम केला होता. अमरावतीची सभा आटोपती घेत विदर्भ दौऱ्यांचा समारोप करून लगेच मुंबईला रवाना झाले होते. भंडारा आणि जिल्ह्य़ातील नागपूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी त्यावेळी नाराज झाल्यामुळे राज ठाकरे यांचे नागपूर आणि भंडारा जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आज पुन्हा विदर्भात आगमन झाले.
दुपारी १२.३० वाजता नागपूर विमानतळावर राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नागपूरचा कडक उन्हाळा बघता राज ठाकरे यांची निवास व्यवस्था रामदासपेठमधील हॉटेल तुली इम्पिरियलमध्ये करण्यात आली तर पदाधिकाऱ्यांची बैठक शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
दुपारी अडीचच्या सुमारास बैठक सुरू झाल्यानंतर जवळपास दीड ते दोन तास नागपूर शहर आणि जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनीा संबोधीत केले. यावेळी विदर्भातील मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.