दुचाकी मोटारसायकल गॅरेज मालक व मेकॅनिक राज्य महासंघाची स्थापना सोलापुरात करण्यात आली. या महासंघाच्या अध्यक्षपदी सोलापूरचे राजेंद्र घुले तर सरचिटणीसपदी ललत म्हेत्रस यांची निवड झाली.
गांधी नगरातील हेरिटेज लॉनवर आयोजिलेल्या एका बैठकीस राज्यातून मोटारसायकल गॅरेज मालक व मेकॅनिक मंडळींचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी राज्य महासंघाची स्थापना करण्यात आली. या सभेस राज्यातील विविध जिल्ह्य़ातून २३ असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महासंघाचे निवडलेले गेलेले अन्य पदाधिकारी असे : उपाध्यक्ष-चांदभाई सय्यद (औरंगाबाद), चंद्रकांत खिलारे (भोसरी, पुणे), दिलीप कोरडे (हडपसर, पुणे), कार्याध्यक्ष-करमरकर (पुणे), खजिनदार-धनंजय अस्वले (कोल्हापूर),सहचिटणीस-मनोज मुळे (मिरज), सतीश कोडा (बीड).
राज्यात मोठय़ा शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत दुचाकी गॅरेज मालक व मेकॅनिक मंडळींना प्रदेश पातळीवर एकत्र येणे ही काळाची गरज होती. नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व आधुनिक उपकरणे, दुरुस्ती साहित्य, यंत्रसामग्री मिळण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेणे तसेच माफक दरात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष राजेंद्र घुले यांनी या वेळी बोलताना सांगितले.