नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर मॅरेथान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  या वेळी सकाळी पामबीच मार्गावर संपूर्ण ठाणे, मुंबईसह रायगड जिल्हय़ातील १० हजारांहून अधिक हौशी धावपटू मॅरेथान स्पर्धेत धावले, तर निरामय आणि निरोगी नवी मुंबईसाठी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेते जितेन मुखी, नवीना भोळे, डॉ. गौरव हंस, सुशील पराशर यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन नवी मुंबईकरांना निरोगी आरोग्यासाठी प्रोत्साहन दिले.  त्याचप्रमाणे नौदलाच्या बँड पथकाची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. आरोग्यासाठी ‘रन नवी मुंबई रन’ अशी ही मॅरेथान स्पर्धा झाली. सामाजिक बांधीलकीबरोबरच आरोग्याचा संदेश देणारी ही महापौर मॅरेथान स्पर्धा पुरुष, महिला, मुले, मुली, ज्येष्ठ नागरिक, महानगरपालिका अधिकारी, पत्रकार आणि अपंग अशा सहा गटांतून झाली. १५ कि.मी. अंतराच्या खुल्या पुरुष गटात मुनींदर सिंग यांनी ४९ मिनिटे २० सेकंदांत, तर महिला गटात नीलम राजपूत यांनी ५७ मिनिटे ३२ सेकंदांत अंतर पार करून नवी मुंबई महापौर मॅरेथॉनचे ते विजेते ठरले. त्यांना महापौराच्या हस्ते प्रत्येक ३१ हजार रुपये व विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.