दिघा, विष्णूनगर येथे एका सात वर्षीय चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने अतिप्रसंग केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर रबाले एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केले आहे. शरद रामचंद्र भोसले (४५) असे या आरोपीचे नाव आहे. भोसले याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. पीडित मुलीला आईने दुकानातून साहित्य आणण्यासाठी पाठविले होते. घरी परत येत असताना, भोसले याने तिला घरात बोलावले. यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेची कोठेही वाच्यता न करण्याची धमकी त्याने तिला दिली होती. या प्रकारामुळे ही मुलगी भेदरली होती. घरी येण्यास उशीर का झाला याबाबत तिला आईने विचारले असता, तिने हा सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी भोसले याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.