नागपूर विद्यापीठाने फेरमूल्यांकनाचे निकाल दोन महिने उशिरा लावल्याने मास्टर्स ऑफ इंजिनियरिंग (एम.ई.) अभ्यासक्रमाच्या सुमारे ३० विद्यार्थ्यांंचे महत्त्वाचे एक वर्ष वाया गेले आहे. या विद्यार्थ्यांनी विरोध नोंदवूनही त्याचा काही उपयोग झालेला नाही.
विद्यापीठाने एम.ई. अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या फेरमूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास दोन महिने वेळ लावल्याने या विद्यार्थ्यांवर ही परिस्थिती ओढवली. खरेतर या विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्राची परीक्षा गेल्या आठवडय़ात सुरू झाली, परंतु त्यांचे पहिल्या वर्षांच्या फेरमूल्यांकनाचे निकाल तोपर्यंत जाहीर व्हायचे असल्याने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना परीक्षेला बसू देण्यास नकार दिला. जी.एच. रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर विमेन या संस्थेसह इतर ठिकाणच्या या विद्यार्थ्यांनी याच्या विरोधात पालकांसह विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर निदर्शनेही केली, तसेच अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी न देऊन त्यांचा अपमान करण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करताना या प्रकरणी स्वत: लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या फेरमूल्यांकनाचे निकाल लगेच जाहीर करण्याचे आश्वासन दिले. हे विद्यार्थी बहुतांश विषयांमध्ये अनुत्तीर्ण होऊन ‘डिस्कन्टिन्यूड’ झाल्यामुळे त्यांना पुढील परीक्षेला बसू देण्यात आले नाहीत. परंतु फेरमूल्यांनात ते संबंधित विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्यास त्यांना अर्धा तासात परीक्षा ओळखपत्र देण्यात येईल, जेणेकरून ते पुढील पेपरला बसू शकतील अशी हमी त्यांनी दिली.
तथापि, परीक्षेचे संपूर्ण शुल्क भरूनही आम्ही किमान ‘काँप्युटर सिक्युरिटी अँड नेटवर्किंग’ या किमान आणखी एका पेपरला बसू शकणार नाही अशी भीती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये होऊन तिचा निकाल तीन महिन्यांनी, २५ मार्चला जाहीर करण्यात आला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला, परंतु दोन महिने होऊनही विद्यापीठाने त्यांचा निकाल घोषित केला नाही. अशारितीने निकाल ४५ दिवसात लावणे अनिवार्य करणाऱ्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीचा भंग झाला आहे. परंतु, फेरमूल्यांकन ही विद्यार्थ्यांना दिलेली ‘जास्तीची सुविधा’ आहे व त्यामुळे तिला कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाने दिले.
आमच्या उत्तरपत्रिका योग्यरितीने तपासल्या गेल्या नसून, अनेक उत्तरांना तर गुणच देण्यात आले नाही हे विद्यापीठाने दिलेल्या छायाप्रतींवरून दिसून येते, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून, मदत करण्याऐवजी प्रत्येक वेळी विद्यापीठाकडे पाठवल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही दोष दिला. आम्ही महाविद्यालयाला लाखो रुपये शुल्क देतो, परंतु ते आमच्या समस्या ऐकूनही न घेता आम्हाला वाऱ्यावर सोडतात. पदवी परीक्षेतही फेरमूल्यांकनानंतर आमचे गुण ३०-४० ने वाढले होते. आधीच ते आमच्या उत्तरपत्रिका चांगल्यारितीने का तपासत नाहीत, असा संतप्त प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारला.
विद्यापीठावर अशाप्रकारचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच कारणासाठी सिनेटच्या मागील बैठकीच्या वेळेस विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणावर निदर्शने केली होती. व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठाच्या समितीने फेरमूल्यांकन सदोष होत असल्याचे मान्य करून संपूर्ण पद्धतीत सुधारणा करण्याची शिफारस केली होती, परंतु समितीच्या शिफारशींवर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.