News Flash

समाज माध्यमांचा वापर, शिक्षण संस्थांची कार्यशैली कारणीभूत

समाज माध्यमांचा वापर, खासगी शिक्षणसंस्थांची कार्यशैली आणि राज्य शासनाची चुकीची धोरणे.. यामुळे नाशिक विभागीय मंडळात बारावीचा निकाल घसरल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

| May 28, 2015 08:08 am

समाज माध्यमांचा वापर, खासगी शिक्षणसंस्थांची कार्यशैली आणि राज्य शासनाची चुकीची धोरणे.. यामुळे नाशिक विभागीय मंडळात बारावीचा निकाल घसरल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात सर्वात कमी निकालाची नोंद नाशिक विभागीय मंडळात झाली. या संदर्भात प्राध्यापकानी मांडलेली मते त्यांच्याच शब्दात..

समाज माध्यमांचा अधिक वापर
विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा खासगी शिकवणीवर अधिक भर आहे. यामुळे महाविद्यालयात नियमित वर्गाना दांडी मारणे, परीक्षांना अनुपस्थित राहणे असे प्रकार विद्यार्थ्यांकडून सर्रास घडत आहे. त्याला महाविद्यालयाने बदललेली कार्यपध्दती तितकीच जबाबदार आहे. पूर्वी शैक्षणिक संस्था संस्थाचालक किंवा एखादे मंडळ चालवत होते. आता एखादी व्यक्ती चालवते. त्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. दुसरीकडे, मुलांकडे आलेले अत्याधुनिक भ्रमणध्वनीमुळे समाज माध्यमांवर विद्यार्थी गर्क असतात. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूकमध्ये ते अडकलेले आहेत.
– प्रा. आनंद बोरा.

टक्केवारी ऐवजी गुणवत्तेचा विचार करणे आवश्यक
राज्याचा निकाल पाहता नाशिक विभाग केवळ तीन टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षांंपासून ही घसरण सुरू आहे. मात्र निकालाची टक्केवारी वाढली म्हणजे गुणवत्ता वाढली असे होत नाही. राज्य शासनाने सध्या परीक्षार्थी तयार करण्याची योजना सुरू केली आहे. यामध्ये दर वर्षी हजाराच्या पटीत विद्यार्थी बाहेर पडतात. परीक्षेतील काही गुण हे महाविद्यालयाच्या हातात असल्याने टक्केवारी वाढत जाते. मात्र गुणवत्तेचा प्रश्न कायम आहे. यामुळे गुणवत्तेविषयी चर्चा आणि ठोस उपाय होणे गरजेचे आहे.
– प्रा. मिलींद वाघ (शिक्षणतज्ज्ञ)

‘कॉपी पॅटर्न’चा मुक्त प्रसार
राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता उत्तीर्ण करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे मुलांमध्ये परीक्षेचे गांभिर्य राहिलेले नाही. मुलांमध्ये आत्मविश्वास बळावला आहे. त्यात दहावीची परीक्षा घरच्यांच्या धाकात पार पडते. मात्र बारावीला इकडून तिकडून काही मदत मिळेल, कॉपी करता येईल या भ्रमात मुले राहतात व अभ्यास करत नाही. मुळात चंगळवाद किंवा अन्य काही कारणांमुळे मुलांमध्ये जिगीशावृत्तीच राहिलेली नाही. यामुळे कॉपी पॅटर्नचा वाढता वापर यामुळेही निकालावर परिणाम होत आहे.
– प्रा. दत्तात्रय बच्छाव

बदलती जीवनशैली कारक
नाशिक शहराचा वाढता विस्तार व विकास पाहता शहराने मुंबई-पुण्याची जीवनशैली अंगीकारली आहे. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढत असताना पालकांनीही विद्यार्थ्यांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. परिणामी मुलांवर कोणाचा वचक नाही. महाविद्यालयांमध्ये ज्या परीक्षा होतात, त्या विद्यार्थ्यांच्या लेखी चेष्टेचा विषय असतात. पालकही वर्षभरात होणाऱ्या परीक्षेपेक्षा वार्षिक निकालास महत्व देतात. १२ वी परीक्षेच्या वेळी आपले पालकांना जाग येते. त्यावेळी अभ्यास, घोकम्पट्टीचा, रट्टा, संपुर्ण रात्र अभ्यास असे काही करत परीक्षा पार पाडली जाते. या सर्व गोष्टींचा निकालावर परिणाम होत आहे. ‘लातुर पॅटर्न’प्रमाणे नाशिकचा शैक्षणिक क्षेत्रातील ढासळता आलेख उंचावण्यासाठी खास पॅटर्न राबविण्याची गरज आहे.
प्रा. मनेष पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2015 8:08 am

Web Title: reasons behind bad hsc result in nashik
टॅग : Exam,Hsc Results,Nashik
Next Stories
1 सिंहस्थ आपत्तीपूर्व नियोजनात स्थानिकांचा सहभाग गरजेचा
2 क्रॉम्प्टन ग्रीव्हज् संपाबाबत कोणतीही तडजोड नाही
3 सिंहस्थाच्या भाराने राज्य शासनाच्या नाकी नऊ
Just Now!
X