येथील राजर्षी शाहू टर्मिनलचे स्थलांतर नजीकच्या काळात होण्याची शक्यता अल्प आहे. ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असल्याने त्यासाठी बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगत रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या स्थलांतरावर लाल फुली ओढली. रेल्वेस्थानकात सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.    
कोल्हापुरातील सध्याचे रेल्वेस्थानक मार्केट यार्ड मध्ये हलविण्यात यावे, अशी चर्चा गेल्या महिन्याभरात नव्याने सुरू झाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या आशयाचा ठरावही करण्यात आला होता. तथापि रेल्वे स्थानकाची शक्यता सिंग यांच्या वक्तव्यातून मावळतीला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंग म्हणाले, रेल्वे स्थानक स्थलांतर होण्याची शक्यता अत्यल्प आहे. जुने रेल्वेस्थानक बदलण्याचे सद्यस्थितीत कोणतेही नियोजन नाही. रेल्वेस्थानक स्थलांतराची प्रक्रिया क्लिस्ट व प्रदीर्घ काळ चालणारी आहे. याकरिता जमीन व निधीची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे रेल्वेस्थानक स्थलांतराचा प्रस्ताव रेल्वे प्रशासन सध्यातरी विचार करणार नाही.    
कोल्हापूर रेल्वेस्थानकात करण्यात येणाऱ्या सुधारणांबाबत सिंग म्हणाले, रेल्वेस्थानकाकडून राजारामपुरीकडे जाण्यास पूल बांधण्यात येणार आहे. तेथे तिकीट बुकिंग कार्यालय सुरू करणे, प्लॅटफॉर्मवर शेड मारणे, स्थानकासमोर रस्त्याची डागडुजी करणे ही कामे तीन महिन्यात पूर्ण केली जाणार आहेत. रेल्वे परिसर स्वच्छता, प्रतीक्षालय, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टरची दुरुस्ती याकडेही लक्ष दिले जाणार आहे.     
प्रवाशांच्या सोयीकरिता जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा केंद्र चालू केले जाणार आहे. यामध्ये व्यावसायिकांना परवाना दिला जाणार नाही. या सेवेसाठी प्रवाशांना प्रत्येकी एक रुपया जादा द्यावा लागणार असला तरी प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. परिख पुलाबाबत ते म्हणाले, पुलाच्या वरच्या बाजूची डागडुजी व दुरुस्ती करणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. परिख पुलाची दुरावस्था रोखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यावेळी स्टेशन मास्टर व्ही. आर. विजयकुमार उपस्थित होते.