वीजचोरांवर कारवाई करा, आकडे तोडा. परंतु नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा, अशा सूचना देतानाच भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बिल वेळेवर भरले तर सर्वच परिसर भारनियमनमुक्त करता येईल, अशी ग्वाही पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
शहरातील महावितरणच्या ३० कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन मंत्री क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. आमदार बदामराव पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, सभापती संदीप क्षीरसागर, अरुण डाके, उपनगराध्यक्ष शेख शाकेर, आघाडीचे अ‍ॅड. शेख शफीक, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. हेमा पिंपळे व अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे आदी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले की, शहरात मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिल देण्याच्या प्रकाराने ग्राहक वैतागले आहेत. घरात केवळ दोन बल्ब असलेल्यांना पाच हजार रुपये बिल दिले जाते. हे प्रकार तत्काळ थांबवा. वीज चोरांवर कारवाई करा, आकडे तोडा. मात्र, नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पायाभूत सुविधा अंतर्गत शहरातील साडेचारशे खांब बदलण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वेळेवर आणि नियमित बिल भरले तर भारनियमन बंद होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.