जिल्ह्य़ास वर्षांकाठी किमान ५ हजार रक्ताच्या बाटल्यांची गरज पडते. हिंगोलीत रक्तपेढी सुरू झाली असल्याने वर्षभरात ३० रक्तदान शिबिरे विविध संघटनांच्या सहकार्याने भरविली गेल्यास ही गरज भागविली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी केले.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार बैठकीत डॉ. बोल्डे बोलत होते. डॉ. नंदकिशोर करवा, डॉ. दीपक मोरे आदी या वेळी उपस्थित होते. १४ जून ते १४ जुलै हा महिना रक्तदान महिना म्हणून साजरा केला जाईल, असे डॉ. बोल्डे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी व रक्तविघटनाचे काम सुरू झाले आहे. या साठी २२ लाख निधी मिळाला होता. या पुढील काळात जिल्हा रुग्णालयात एक हजार रक्त बाटल्यांचा साठा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.