देशाची टायगर कॅपिटल म्हणून नागपूरची ओळख आहे. गोरेवाडा येथे जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रहालय तयार करण्यात येत आहे. तसेच त्याच ठिकाणी एक रेस्क्यू सेंटर तयार करण्यात येणार आहे. या रेस्क्यू सेंटरमधून माफ्सूच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता यावे म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि राज्याच्या वनविभाग यांच्यात एक सामंजस्य करार होणार आहे. या माध्यमातून वन्यप्राण्याचा उपचार करणारे नवे डॉक्टर माफ्सूतून तयार होतील, असा आशावाद कुलगुरू डॉ. आदित्य कुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. याविषयी विद्यापीठाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प मध्य भारतात आहेत. तसेच गोंदिया जिल्ह्य़ातील नागझिरा, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा अंधारी, अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाट, वर्धा जिल्ह्य़ातील बोर, नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड कऱ्हाडला व मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे संयुक्त अभयारण्य असलेले पेंच असे सहा अभयारण्य आहेत. यासह महाराष्ट्रात अनेक वन्यजीव अभयारण्य आहेत. विदर्भातील अभयारण्यात झालेल्या अपघातात जखमी वन्यप्राण्यांना नागपुरात उपचारासाठी आणले जाते. नागपुरात वन्य प्राणिसंग्रहालयात एक रेस्क्यू सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या वन्य प्राण्यांवर नागपूर येथील महाराजबागेतील उपचार केंद्रावर किंवा स्थानिक पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर उपचार करतात. याचा फायदा माफ्स्यूतील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जबलपूर येथे माफ्स्यूने रेस्क्यू सेंटरमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाच्या धर्तीनुसार परंतु त्यापेक्षा अधिक समृद्ध असा प्रकल्प तयार करण्याचा मानस व्यक्त केला आहे. १७ कोटींचा प्रस्ताव तयार असून तो राज्य शासनासमोर ठेवण्यात आला आहे. यावेळी मंडळाच्या बैठकीत वनविभागाचे प्रधान सचिव प्रवीण कुमार परदेसी, वनविभागाचे मंत्री पतंगराव कदम, पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्यावर परवानगी आल्यावर वनविभाग व माफ्सू सामंजस्य करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.