संशोधन केवळ व्यक्तिगत प्रगतीसाठी करू नका तर संशोधन समाजाला उपयोगी पडेल या भावनेतून करा, असे आवाहन केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. टी रामास्वामी यांनी केले. रायसोनी ग्रुपतर्फे चौथ्या भारतीय युवक विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ एम.एस. स्वामीनाथन व रायसोनी ग्रुपचे अध्यक्ष सुनील रायसोनी व्यासपीठावर होते.
डॉ. रामास्वामी म्हणाले, विज्ञान देशाला आकार देत आहेत. हा आकार देण्याचे काम आजचा युवावर्ग करीत आहे. विद्यार्थ्यांचे उपक्रम आणि शक्ती नवनिर्माण करण्यासाठी उपयोग करावा. आपण अनेक समस्यांवर केवळ वांझोटय़ा चर्चा करतो. मात्र उत्तरांचा शोध घेत नाही. ते काम इतरांवर ढकलत असतो. विज्ञानाच्या माध्यमातून समस्या सोडवायला हव्यात. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानामुळे समाजविज्ञान शाखा आणि पायाभूत विज्ञानाकडे(बेसिका सायन्सेस) दुर्लक्ष झाले. आजच्या ऊर्जा, आरोग्याच्या समस्या पायाभूत विज्ञानातूनच सुटू शकतात. त्यामुळे पायाभूत विज्ञानाकडे पालक, शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनीदेखील वळले पाहिजे. शिक्षकांनी संशोधन म्हणजे पीएच.डी. केवळ स्वत:चा विकास किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी न करता समाजाला त्या संशोधनाचा काय उपयोग होईल, याचाही विचार करावा. एम.एस. स्वामीनाथन संशोधन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. अजय परिदा यांनी स्वागतपर भाषण केले. सुनील रायसोनी यांचे अध्यक्षीय भाषण पार पडले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री जयपाल रेड्डी यांनी ऑनलाईन उद्घाटनपर भाषण केले. एम.एस. स्वामीनाथ यांचेही यावेळी भाषण झाले. हेमंत सोनारे यांनी आभार मानले. ‘भारताच्या भवितव्याला आकार देण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे महत्त्व डॉ. टी.रामास्वामी आणि प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.