कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील लहानमोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे मागील महिन्यापासून संथगतीने सुरू आहेत. तरीही नाल्यांमधून काढलेला गाळ अनेक ठिकाणी नाल्यांच्या काठी ठेवण्यात आला आहे. पाऊस सुरू होताच हा गाळ पुन्हा नाल्यामध्ये वाहून जाणार असल्याचे चित्र दिसत असून रस्त्याच्या कडेला साठलेल्या या घाणीतून येणाऱ्या दरुगधीमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी नालेसफाई कामाची पाहणी केली. त्या वेळी अधिकाऱ्यांना नाल्यांमधून काढलेल्या गाळाचे नाल्यांच्या काठी ढीग करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ढीग आढळून आले आहेत तेथील संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा विचार अधिकारी करीत आहेत. नाल्यांमध्ये पाणी तुंबणार नाही अशा पद्धतीने नालेसफाई करण्यात आली असली तरी गाळ मात्र रस्त्यांच्या कडेला साठवून ठेवण्यात आला आहे. नालेसफाईच्या कामावर महापालिका पदाधिकारी, स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी स्पष्ट केले.