गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्ह्य़ांमध्ये अटक केलेल्या आरोपींमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपी महिला असल्याचे दिसून आले आहे. गुन्हेगारीमध्ये महिलांचे वाढते प्रमाण या घटनांवरून स्पष्ट होत आहे. पूर्वी महिलांचा कौटुंबिक िहसचाराच्या गुन्ह्य़ात सहभाग असायचा, आता खून, खंडणी, अपहरण आणि चोरीच्या गुन्ह्य़ातील सहभाग वाढला आहे.
८० गुन्हे करणारी सविता बबलानी
मंगळवारी खार पोलिसांनी सराफांना गंडा घालून चोरी करणाऱ्या सविता बबलानी (४५) नावाच्या महिलेला अटक केली. तिच्या नावावर ८० हून अधिक गुन्ह्य़ांची नोंद असल्याचे उघड झाले. ती प्रामुख्याने सराफांना आपले लक्ष्य बनवायची. बोलण्यावर प्रभुत्व, घरंदाज राहाणी या मुळे ती सराफांवर छाप पाडायची. कधी हातचलाखीने दागिने लंपास करायची, कधी दागिने दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांना हॉटेलात बोलावून दागिने लंपास करायची अशी तिची पद्धत होती. ती मूळची उल्हासनगरची होती. पण मुंबई आणि उपनगरात तिने धुमाकूळ घातला होता. खारमधील एका नामांकित सराफाला तिने अशाच पद्धतीने गंडा घातला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली होती.
नेपाळी टोळीतही महिला
मुंबईत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या नेपाळी नागरिकांचा गुन्ह्य़ातील सहभाग नवीन नाही. पण आता नेपाळी महिलासुद्धा मुंबईच्या गुन्हेगारीत सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी खार येथील एका सराफाच्या दुकानात चार नेपाळी महिलांनी चोरी केली. पर्यटक म्हणून त्या आल्या होत्या. गॉगल, पर्यटकांच्या बॅगा, फॅन्सी वेषभूषा त्यांनी केली होती. त्यात त्या नेपाळी. त्यामुळे त्या पर्यटक असल्याचे भासत होते. अशाच प्रकारे जुहूमध्येही त्यांनी एका सराफाच्या दुकानात चोरी केल्याचे उघड झाले आहे. नेपाळी महिलांची ही टोळी फरारी आहे.
चार बहिणींची टोळी
गुन्हे शाखा ५ ने चोरीच्या एका प्रकरणात तीन तरुण महिलांना अटक केली. त्या सख्ख्या बहिणी होत्या. सुजाता शेख (२४), मीना इंगळे (२०), अरुणा पाटील (२५), अशी त्यांची नावे. त्यांची चौथी बहीण फरारी आहे. या बहिणी गेल्या काही वर्षांपासून घरफोडय़ा करीत होत्या. ६० हून अधिक चोऱ्या केल्याचे त्यांनी कबूल केले. लोखंडी पट्टीच्या सहाय्याने कुलूप उघडण्याची अवघड कला त्यांना अवगत होती. दोन बहिणी हे काम करायच्या तर इतर दोन पहारा द्यायच्या. कुणाला संशय आला तर आरडाओरड करून अंगावर हात टाकल्याचा कांगावा करून स्वत:ची सुटका करून घ्यायच्या. त्यांचे राहणीमान उत्तम असल्याने कुणाला संशय येत नसे.
महिला गुन्हेगारांचे प्रमाण वाढले वर्ष  अटक केलेल्या महिला आरोपी
२०१०- ३०,११८
२०११- ३०,१५९
२०१२- ३०,६०७
या तीन वर्षांतील महिला आरोपींचे प्रमुख गुन्हे खालीलप्रमाणे
कौटुंबिक हिंसाचार- २८ हजारहून अधिक
दंगल- १६,८४३
दुखापत- १५,३४८
चोरी- ३,९११
खून- १,९००
खूनाचा प्रयत्न- १,७००
राज्यातील प्रमुख शहरांत अटक झालेल्या महिला
मुंबई-  २५३८
जळगाव- १७८०
नाशिक ग्रामीण- १७७६
अहमदनगर- १६८७
 पुणे- १३६३