त्र्यंबकेश्वरमधील वास्तवाने पोलीस अधिकाऱ्यांच्या चिंतेत भर

सिंहस्थ कुंभमेळ्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना त्र्यंबकेश्वर शहरात अनेक कामे अपूर्ण असल्याने आणि ही कामे कधी पूर्ण होतील, याविषयी कोणतीही उपलब्ध नसल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी अवाक झाले. विकास कामांसंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांकडून मिळणारी माहिती आणि वास्तवात असलेली स्थिती याचा कोणताही ताळमेळ लागत नसल्याने पोलीस अधिकारी अधिकच गंभीर झाले आहेत. अत्यंत कमी कालावधीत कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असतानाही त्यांच्याकडून दाखविण्यात येत असलेला निष्काळजीपणा कामांच्या वेळेत पूर्ण होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
सद्यस्थितीत त्र्यंबक नगरी व परिसरात रस्ते खोदलेले, अर्धवट कामे अशी स्थिती आहे. कुंभमेळ्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयीची पाहणी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक के. एल. बिष्णोह यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक जगजितसिंह, नाशिकचे पोलीस आयुक्त एस्. जगन्नाथन, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी कुंभमेळा पथकासह त्र्यंबकेश्वरचा दौरा केला. त्र्यंबकेश्वर मंदिर, वाहनतळ, कुशावर्त तीर्थ आणि शाही मार्गाची पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते. शहरात आगमन झाल्यावर चालण्यासाठी एकही रस्ता नाही. सर्वच रस्ते खोदलेले, ठिकठिकाणी खड्डे, कामांसंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही, असे चित्र अधिकाऱ्यांना दिसून आले. कामांची कशी स्थिती आहे, कामे कधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, याविषयी माहिती देण्यास पालिकेचे अधिकारी उपलब्ध नसल्याने जगजितसिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुशावर्तालगत टेहळणी मनोऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही सर्व कामे त्वरित करण्याची सूचना त्यांनी दिली. कागदोपत्री कामे होत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात सर्वत्र कामे अपूर्ण असून ही कामे कधी पूर्ण होतील, सिंह्स्थाच्या आत कामे पूर्ण होतील किंवा नाही, याविषयी कोणीही हमी देत नसल्याने कठीण प्रसंग उभा राहण्याची चिन्हे आहेत. कामांसंदर्भातील गोंधळ आणि निष्काळजीपणा पाहून पोलीस अधिकारी कमालीचे हैराण झालेले दिसून आले. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविषयीही त्यांनी विचारणा केली. कुशावर्तात सर्व साधु, महंत आणि भाविक शाही स्नानासाठी येत असल्याने त्यांचे येण्याचे आणि परतीचे मार्ग कसे आहेत आणि कोणते आहेत, तसेच भविकांच्या स्नानाची सोय काय, याबाबतही त्यांनी विचारणा केली. परंतु मिळणारी अपूर्ण माहिती आणि त्या माहितीचा प्रत्यक्ष स्थितीशी कोणताही ताळमेळ लागत नसल्याचे पाहून अधिकाऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली.
अधीक्षक संजय मोहिते यांनी गोदाघाट पायऱ्यांच्या कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. कचरा डेपो तसेच जव्हार फाटय़ालगतच्या कामांची पाहणी करून काम त्वरेने करण्यास बजावले. कचरा डेपोजवळ अद्यापही कचऱ्याचे प्रचंड ढीग असून त्यांची विल्हेवाट लावणे बाकी आहे.
कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असतानाच बदलत्या निसर्ग चक्रामुळे या आव्हानात अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील सप्टेंबरपासून नाशिक जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात कुठे ना कुठे पावसाने हजेरी लावली असून बुधवारी या अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील कामांची पाहणी केल्यानंतर काही अवधीतच नाशिक शहर व परिसरात हलक्या सरी कोसळल्या. निसर्गाचा हा लहरीपणा यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनापुढील अडचणींमध्ये अधिकच भर पडू शकते. घाईघाईने काम पूर्ण करण्याचे ठरविल्यास त्याचा परिणाम कामाच्या दर्जावर होण्याची भीती आहे. कामांच्या पूर्ततेविषयी सद्यस्थितीत निश्चितपणे कोणतीही माहिती देणे अधिकाऱ्यांसाठी कठीण असल्याने माहिती देणे टाळण्यावरच भर दिला जात आहे. कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेणे आणि पाहणी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री नाशिकसह त्र्यंबकेश्वरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधी किमान रस्त्यांची कामे तरी पूर्ण व्हावीत, याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.