राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरू असणाऱ्या वाक् युद्धाची परिणती मनसे अध्यक्षांच्या वाहनावर दगडफेकीत झाल्यानंतर या पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये त्याचे पडसाद उमटले. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली रास्ता रोको करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीचा निषेध केला. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे आ. वसंत गिते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात महिला पदाधिकारी व नगरसेविका मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जळगाव येथेही मनसेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यात भिंगार येथे मंगळवारी रात्री राज ठाकरे यांच्या वाहनावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेचे बुधवारी सकाळपासून संतप्त पडसाद उमटण्यास सुरूवात झाली. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार असून महापालिकेत या पक्षाची सत्ता आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने सकाळपासून खबरदारीचे उपाय योजत मनसेच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करत प्रमुख पदाधिकाऱ्यांवर बारकाईने नजर ठेवली होती. आ. गिते यांच्या मुंबई नाका कार्यालयाबाहेर सकाळपासून मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होवू लागले. आ. गिते हे देखील आपल्या कार्यालयात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून आंदोलन केले जावू शकते, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कुमक वाढविली. दरम्यानच्या काळात मनसेच्या कार्यकर्त्यांचा एक गट पोलिसांची नजर चुकवून शिताफीने मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर पोहोचला. उड्डाणपुलावर आधीपासून अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोणाला काही समजण्याच्या आत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा पेटवून पुलावरून खाली सोडला. ही बाब लक्षात झाल्यावर पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने उड्डाणपुलावर धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
ही धरपकड सुरू असताना पुलाच्या खालील बाजुस म्हणजे मुंबई नाका चौकात आ. गिते, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेविका सुजाता डेरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना अटक केली. साधारणत: तासभर हा गोंधळ सुरू होता. या आंदोलनानंतर उर्वरित कार्यकर्ते त्र्यंबक रस्त्यावरील राजगड या मनसेच्या जिल्हा कार्यालयावर पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मनसेच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होवून काही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस यंत्रणा घेत होती. दरम्यान, जळगाव शहरातील आकाशवाणी कार्यालयाच्या समोरील राष्ट्रीय महामार्गावर मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जळगाव शहरातील काही भागात स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्यात आला. पाऊण तास चाललेल्या रास्ता रोकोत महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. राष्ट्रवादीच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.