मोटार वाहन अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहात नवी मुंबईत विभागामार्फत अभिनव उपक्रम राबवण्यात आला. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहित करण्यात आले. दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणारे, कार चालवताना सीट बेल्ट लावणारे, तसेच सिग्नलच्या ठिकाणी शिस्तीचे पालन करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
सुरक्षा सप्ताहामध्ये वाशी येथे ड्रीम वॉकेथॉन करण्यात आली. त्यामध्ये वाहूतक पोलिसासह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, नवी मुंबईत रिक्षांना ट्रॅफिक स्मार्ट आयकार्ड बसवण्यात आले आहे. त्याद्वारे रिक्षातील प्रवाशाला त्याच्याकडील मोबाइलवरच रिक्षाचालकाची माहिती कळणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅफिक स्मार्ट आयकार्डचा शुभारंभ आयुक्त के.एल.प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना तिळगूळ वाटप करून अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली. तसेच सीवूड येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक पोलीस आणि एस.एस. हायस्कूलच्या वतीने रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी बॅनर्सच्या माध्यमातून नागरिकांना वाहन सुरक्षेचा संदेश दिला. दुचाकीस्वारांत हेल्मेटविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.