कुरीअर कंपनीत जमा झालेली ११ लाख ७८ हजारांची रोकड बळजबरीने चोरून नेणाऱ्या चोरटय़ांचा शोध शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला असून याप्रकरणी दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. ही चोरी करण्यासाठी टीप देणारा व्यापारीही जाळय़ात सापडला.
सुधीर जनार्दन सलगर (वय ३३, रा. जुना पुणे नाका, सोलापूर) व जितेंद्र पटेल या व्यापाऱ्याला या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली असून अन्य दोघा संशयित गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली आहेत. जयेशकुमार मंगलभाई ओझा (रा. रूपाभवानी मंदिराजवळ) हे कुरीअर कंपनीत नोकरीस असून गेल्या २२ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मार्केट यार्डात काही व्यापाऱ्यांनी कुरीअरसाठी दिलेली ११ लाख ७८ हजार ५२० रुपयांची रोकड पिशवीत घालून ओझा हे आपल्या सहकाऱ्यासह मोटारसायकलवरून घराकडे परत येत होते. तेव्हा वाटेत दयानंद महाविद्यालयासमोर रस्त्यावर चार तरुणांनी मारहाण करून त्यांच्या जवळील संपूर्ण रक्कम लुटून नेली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्य़ाचा तपास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावला. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती व पोलीस निरीक्षक नितीन कोसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या पथकाने या गुन्ह्य़ाची उकल केली. मिळालेल्या माहितीवरून सुधीर सलगर यास ताब्यात घेतले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अखेर त्याने दिलेल्या कबुलीनुसार हा गुन्हा सलगर याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले. या चोरीची टीप जितेंद्र पटेल या व्यापाऱ्याने दिल्याची माहितीही उघड झाली. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता कुरीअरद्वारे (हवाला) बरीच मोठी रक्कम मार्केट यार्डातील व्यापारी पाठवितात व ही रक्कम दयानंद महाविद्यालयमार्गे जात असल्याची माहिती आपण मुकुंद जवळकर व सुधीर सलगर यांना दिली होती, अशी कबुली पटेल याने दिली. अटकेतील सुधीर सलगर याच्याकडून त्याच्या वाटणीस आलेली एक लाख ४० हजारांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून त्याचे साथीदार मुकुंद जवळकर व त्याच्या दोघा साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2013 9:18 am