आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीसाठी जेएनपीटी बंदरातून पाठविण्यात येणाऱ्या तसेच जाणाऱ्या कंटेनरमधील माल कमी येत असल्याने मालाची चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या असून यामध्ये परदेशी आयात करण्यात आलेला माल मागणीपेक्षा कमी आल्याने उरण व जेएनपीटी पोलीस ठाण्यात मालाची ने-आण करणाऱ्या एजन्सीज तसेच गोदामचालकांकडून तक्रारींच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये देशातून आयात करण्यात येणाऱ्या मालाच्या चोरीच्या घटना अधिक असल्याचे उघड झाल्याने या परिसरातील गोदामांत कंटेनरमधील मालाची चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांनी यांची नोंद घेत कारवाई सुरू केली आहे. या संदर्भातील काही गुन्ह्य़ांचा तपासही लावण्यात उरण पोलिसांना यश आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. अशा गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेनेच काळजीपूर्वक मालाची तपासणी करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात असून अशा वाढत्या घटनांमुळे बंदरातील व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंदराच्या मार्गाने होणाऱ्या व्यापारात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली असून जेएनपीटी बंदरातून देशातील आयात-निर्यातीच्या साठ टक्के व्यवसाय केला जात आहे. बंदरातून होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण जास्त असून आयात कमी प्रमाणात होते. यामध्ये भारतातून इतर देशांत पाठविण्यात येणाऱ्या मालाची तसेच वस्तूंची निर्यात केली जाते. यासाठी ज्या व्यावसायिक एजन्सीमार्फत माल पाठवितात त्यासाठी कंटेनरचा वापर केला जातो. व्यावसायिकांचा माल प्रथम गोदामात आणला जातो, त्यानंतर तो कस्टममार्फत सीएचए तपासून घेतो. त्यानंतर माल जहाजातून परदेशात पाठविला जातो. त्यासाठी शिपिंग एजन्सी काम करते. मालाची शहानिशा करण्याची जबाबदारी सीएचएची असते. मात्र तरीही माल कमी येत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. तसेच आयात झालेला माल गोदामात आल्यानंतर तो कंटेनरमधून ट्रकमध्ये भरून माल मागविणाऱ्या व्यापाऱ्यांकडे पाठविण्यात येत असताना ट्रकमधील मालाची चोरी होत असल्याच्याही तक्रारींत वाढ झाल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी दिली आहे. यामध्ये ट्रकचालक व त्याचे साथीदार यांचा समावेश असतो. यापैकी अनेक चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र त्यातील मालाची संपूर्ण रिकव्हरी होत नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.