पुढील वर्षी येथे होणाऱ्या सिंहस्थात कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील, या संदर्भात सूक्ष्मपणे अभ्यास करून नियोजनात गुंग असलेल्या पोलीस आयुक्तांचे विद्यमान परिस्थितीकडे किंचितसे दुर्लक्ष होताच चोरटे सिंहस्थाआधीच पर्वणी साधत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.
शहरात सोनसाखळी चोरांचा हैदोस कमी म्हणून की काय बुधवारी पहाटे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रविवार कारंजा परिसरात काही दुकाने फोडण्यात आली. चोरीचा माल वाहून नेण्यासाठी चोरटय़ांनी चक्क ट्रकच आणल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने पोलिसांचा चोरटय़ांना कसा कोणताही धाक उरला नाही ते स्पष्ट होत असल्याची भावना नाशिककर व्यक्त करीत आहेत. सतत गजबजलेल्या परिसरात पद्धतशीरपणे दुकानांमधून चोरीच्या घटना घडत असल्यास शहराच्या इतर भागांत कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती असेल ते विचारणेही नको. गुन्हेगारांना पळता भुई थोडी करणारे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनीही नाशिकच्या गुन्हेगारांसमोर गुडघे टेकले की काय, अशी शंका नाशिककरांच्या मनात निर्माण होत आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालक, दुचाकीधारकांकडून पोलिसांनाच मारहाण होण्याचे प्रकार घडत असतानाही पोलिसांकडून कोणतेच कठोर उपाय करण्यात येत नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. मागील आठवडय़ात सोनसाखळी चोरटय़ांनी शहरात धुडगूस घातला. दोन दिवसांत पाच ते सहा ठिकाणी महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावत चोरटय़ांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली. वास्तविक सोनसाखळी चोरीची पहिली तक्रार आल्यानंतर त्वरित शहराच्या इतर भागांमध्येही नाकेबंदी करण्यात आली असती तर किमान काही महिलांचे दागिने ओरबाडण्यापासून राहिले असते. पोलिसांच्या नाकेबंदीत शरीराने धिप्पाड आणि गुंडासारख्या दिसणाऱ्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येऊन किरकोळ देहयष्टीच्या वाहनधारकांवरच पोलीस दादागिरी दाखवीत असल्याचे नाशिककरांचे म्हणणे आहे. आयुक्तांनी आपल्या प्रतिमेस जागत शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविण्याची गरज असून नाशिककरांची त्यांच्याकडून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा आहे. शहरात आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सरंगल यांनी ज्याप्रमाणे आपला दरारा निर्माण केला होता, तो दरारा अलीकडे कमी झाल्यासारखे दिसत असून त्यांनी
पुन्हा आपले रौद्ररूप दाखविण्याची गरज व्यक्त होत आहे.