सिव्हील हडको येथे वेगवेगळ्या ठिकाणी ३ घरांची कुलूपे तोडून चोरी करण्याचा प्रकार घडला. पाळत ठेवून ही चोरी झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
मगनलाल बन्सीलाल तिवारी (वय ५८, रा. सिव्हील हडको, नगर) यांनी त्यांच्या घरातील चोरीची फिर्याद तोफखाना पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. आज पहाटे ते घराला कुलूप लावून पत्नीसमवेत रोजच्या फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले.
त्यानंतर लगेचच कोणीतरी त्यांनी घराला लावलेले कुलुप तोडले व घरात असलेल्या कपाटातून रोख ४० हजार रूपये पळवले. याच पद्धतीने त्यांच्या घरापासून थोडे पुढे श्री. मरकड व श्री. कुलकर्णी यांच्या घरातही अशीच चोरी झाली. तेही घराला कुलूप लावून फिरण्यासाठी म्हणून बाहेर गेले होते. तिवारी यांच्या फिर्यादीतच त्यांचीही फिर्याद दाखल करून घेण्यात आली आहे.
तिवारी पतीपत्नी फिरून घरी आल्यानंतर त्यांना कुलूप तोडल्याचे आढळले. त्यांनी लगेचच तोफखाना पोलिसांना चोरीची माहिती दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे तसेच सहायक पोलीस निरीक्षक विशाल वळवी लगेचच घटनास्थळी आले. ते तिवारी यांच्या घराची पाहणी करत असतानाच मरकड व कुलकर्णी यांच्या घरीही अशीच चोरी झाल्याचे त्यांना समजले. कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.