प्रवाशांशी अरेरावीपणे वागणे, प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणे, रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करणे, अनधिकृतपणे रिक्षा चालवणे आदी कारणामध्ये दोषी आढळलेल्या ४८९ रिक्षाचालकांवर नवी मुंबई आरटीओ कार्यालयाअंतर्गत जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ पर्यंत कारवाई करण्यात येऊन ७ लाख २० हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच क्षमतेपक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या २०० रिक्षाचालकांवरदेखील कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईत प्रवाशांशी अरेरावीपणे वागत असल्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भांडणे होत असतात. तसेच मीटरमध्ये फेरफार करणे, भाडे नाकारणे, अधिक प्रवासी वाहतूक करणे आदी प्रकारामुळे नागरिक त्रस्त होऊन त्यांनी त्या संदर्भातील तक्रारी नवी मुंबई आरटीओकडून केल्या आहेत. या तक्रारीची आरटीओकडून दखल घेत रिक्षाचालकावंर कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेबर २०१४ या वर्षभरात १३६० वाहनांची आरटीओकडून तपासणी करण्यात आली. त्यातील ४५० रिक्षाचालकांच्या तक्रारी निकालात काढण्यात आल्या असून ५७ रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे आकारले असून शेअर रिक्षाच्या नावाखाली जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या २०० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. जादा भाडे आकारणाऱ्या ३ रिक्षा, दूरचे भाडे नाकारणाऱ्या ५५ रिक्षा, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणारे २८ रिक्षाचालक आणि रिक्षामध्ये फेरफार करणारे १४३ रिक्षाचालक यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. याशिवाय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४० रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, असे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.