कॅनरा बँकेचे शाखा व्यवस्थापक के. श्रीनिवासन यांच्या खुनाचे रहस्य सव्वातीन वर्षांनतरही कायमच असून मारेकऱ्यांना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना अपयश आले आहे. या घटनेसह कामठी व उमरेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या आणखी तीन खुनांचा तपासही अद्याप लागलेला नसल्याची माहिती ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिली.
हिंगणापासून बारा किलोमीटर अंतरावरील साखरगोटा गावाजवळ जंगलात ५ जुलै २०११ ला सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला होता. बाजूलाच एक सँट्रो कार उभी होती. कार क्रमांक व त्यातील विमा कागदपत्रांवरून हा मृतदेह के. श्रीनिवासन यांचा असल्याची ओळख पोलिसांना पटली. हिंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. धागेदोरे मिळाले नसल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी हिंगणा पोलिसांबरोबरच ग्रामीण गुन्हे शाखेलाही तपास करण्याचे आदेश १९ जुलै २०११ रोजी दिले होते. त्यानुसार ग्रामीण गुन्हे शाखेने तपास सुरू केला. घटनास्थळी अर्धवट जळालेली कागदपत्रे सापडली होती. त्यात मध्यप्रदेशातील सिवनी गावासंबंधी काही कागदपत्रे असल्याने पोलिसांचा संशय बळावला. गांधीनगरात राहणारे श्रीनिवासन काही वर्षांपूर्वी सिवनी शाखेत होते. तेथे गैरप्रकार झाल्याने चौकशी झाली. श्रीनिवासन त्यात साक्षीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दिशेनेही
तपास केला. सिवनी व इतर ठिकाणी पथके तपासाला गेली होती. काही कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली झाली. हा खून कुणी व कशासाठी केला, याचे रहस्य अद्यापही कायमच आहे.
के. श्रीनिवासन यांची जुलै २०११ मध्ये कॅनरा बँकेच्या इतवारी शाखेत बदली झाली होती. तेथे रुजू होण्यासाठी ते घरून निघाले होते. तेथे पोहोचण्याआधीच त्यांचा खून झाल्याने या घटनेमागील रहस्य अधिकच गडद झाले आहे. या घटनेला सव्वातीन वर्षे उलटली असून मारेकऱ्यांचा शोध लावण्यास ग्रामीण पोलिसांना अपयश आले आहे. बंदोबस्त करतानाच तपासाची दुहेरी जबाबदारी पोलिसांवर असते. या प्रकरणाचा तपास सुरू झाला असतानाच बंदोबस्तात व्यस्त व्हावे लागल्याने तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष तर झाले नाही ना, अशी चर्चा ग्रामीण पोलीस वर्तुळात ऐकायला मिळाली. ग्रामीण गुन्हे शाखेला आता बंदोबस्तात न लावता तपासासाठी मोकळिक देण्याची गरज असल्याचे मत काहींनी
व्यक्त केले. कामठी व उमरेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या आणखी तीन खुनांचे तपासही अद्याप लागलेले नसल्याची माहिती ग्रामीण पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बदलीही झाली. वर्तमान पोलीस अधीक्षिका डॉ. आरतीसिंह यांना यासंदर्भात विचारले. या प्रकरणासंबंधी माहिती नाही. ती जाणून घेऊन तपास नव्या जोमाने केला जाईल, असे त्या म्हणाल्या.