शाळांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करून शालेय वाहतूक सुरक्षित करण्याच्या बहुचर्चित उपक्रमास पहिल्याच दिवशी नियोजनाअभावी फारसे यश मिळाले नाही. रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बस थांब्यांवर शेकडो विद्यार्थ्यांची बसमध्ये चढण्यासाठी पूर्वीप्रमाणेच चढाओढ सुरू होती. नियमित बसेसच्या केवळ काही  फेऱ्या विद्यार्थी वाहतुकीसाठी वाढविल्याने हे चित्र फारसे बदलले नाही. पुढील दोन- तीन दिवसांत ३० चालकांची उपलब्धता झाल्यावर खास शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे बस सेवा सुरू होईल, असे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. या कारणांमुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अतिशय गाजावाजा करत सुरू केलेल्या शालेय वाहतूक सुरक्षिततेच्या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात तरी यशस्वीपणे होऊ शकली नाही.
शहरातील सुमारे ७५ हजार शालेय विद्यार्थी दररोज बसचा वापर करतात. सध्या शालेय वाहतुकीच्या ५० फे ऱ्या असून त्यात १५ अतिरिक्त फेऱ्यांची वाढ होणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाने म्हटले होते. विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचा कमी किमतीतील प्रवासाचा पर्याय उपलब्ध करणारा हा प्रकल्प शुक्रवारी योग्य नियोजनाअभावी फारसा यशस्वी होऊ शकला नाही. प्रकल्पाच्या अंमबजावणीसाठी शहरातील ७६ पैकी २५ शाळांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळ अतिरिक्त १५ बसेस उपलब्ध करून देणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते, परंतु त्याकरिता चालकांची नियुक्ती न झाल्यामुळे या बसेस विद्यार्थी वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या नाहीत.
रविवार कारंजा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे गर्दी उसळल्याचे पाहावयास मिळाले. अनेक बसमध्ये विद्यार्थी प्रवेशद्वाराशी लटकून प्रवास करीत होते. या संदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारपासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले. शहर बस वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या वाढीव बसेस चालकांअभावी सुरू करता आल्या नसल्याचे मान्य केले. पुढील दोन ते तीन दिवसांत ३० चालकांची उपलब्धता होणार आहे. त्यानंतर वाढीव बसेसच्या फेऱ्या नियमितपणे सुरू होतील, असे संबंधितांनी नमूद केले.
शुक्रवारी हा उपक्रम सुरू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या दिवशी शहरात प्रवासी वाहतुकीच्या काही बसेस दुपारपासून विद्यार्थी वाहतुकीसाठी वळविल्या. त्यांच्या फेऱ्यांची संख्या ७ ते ८ पर्यंत मर्यादित राहिल्याने विद्यार्थ्यांची बस पकडताना दमछाक झाली.
वास्तविक, शिक्षण विभागाने कोणते विद्यार्थी कोणत्या शाळेतून, किती वाजता, कोणत्या थांब्यावर येतात याचे इत्थंभूत नियोजन करून परिवहन मंडळास तशी माहिती सादर केली होती. त्यानुसार बसेसचे मार्गही तयार केले आहेत. त्यानुसार सात शालेय समूह तयार करून एका समूहात दोन ते पाच शाळा असतील, असा आराखडा तयार केला. पूर्वी सर्व शाळा एकाच वेळेस सुरू होत आणि सुटत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असे. यामुळे शासनाने शालेय परिवहन समितीची स्थापना करून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.
नवीन प्रयोगात प्रत्येक शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत १० ते १५ मिनिटांचा फरक असल्यामुळे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध होण्यास अडचण येणार नसल्याचा दावा केला गेला, परंतु शुक्रवारी बसची पुरेशी उपलब्धता झाली नाही. चालक उपलब्ध झाल्यानंतर सोमवारपासून ही व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले.