गेली काही महिने पीपल्स एज्युकेशन सोसायटीत सुरु असलेल्या राजकीय वादाचा फटका प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना बसत आहे. सिद्धार्थ महाविद्यालय व इतर अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यपक व  कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालकांनी आदेश देऊनही मुंबई विद्यापीठात वेतन मंजुरीचा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. त्यामुळे प्राध्यपक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या प्रश्नावर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स सोसायटीवरील वर्चस्वावरून गेले वर्षभर प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि आनंदराज आंबेडकर यांच्यात वाद चालू आहे. आनंदराज आंबेडकर यांनी जूनमध्ये सोसायटीचा ताबा घेतला. त्यावरुन पुन्हा आव्हान-प्रतिआव्हान, दावे-प्रतिदावे सुरु आहेत. सध्या न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. परंतु त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासनात व दैनंदिन कामकाजात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचा फटका प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना बसत आहे.
सध्या या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कार्यभार प्रा. यू.एम. मस्के यांच्याकडे आहे. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना जुलै व ऑगस्टचे वेतन मिळालेले नाही. त्याचबरोबर हा गोंधळ असाच चालू राहिला तर सप्टेंबरचे वेतनही मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रा. मस्के प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळावे यासाठी सातत्याने उच्च शिक्षण विभाग व मुंबई विद्यापीठाशी पत्रव्यवहार करीत आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाच्या सह संचालकांनी ३ सप्टेंबर २०१३ ला मुंबई विद्यापीठाला वेतन मंजुरीबाबतचा आदेश दिला आहे. परंतु विद्यापीठाच्या पातळीवर त्यावर काहीच हालचाल केली जात नाही. अनेक प्राध्यपकांनी व कर्मचाऱ्यांनी घरांसाठी कर्ज काढलेले आहेत. त्यांचे मासिक हप्ते १० ते २० हजार रुपयांपर्यंत आहेत. एकूण पीपल्समधील गोंधळ आणि विद्यापीठातील थंड कारभारामुळे प्राध्यापक व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या प्रश्नावर महाविद्यालयांमधील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे.