नवी मुंबईतील दिद्या परिसरात दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चून साने गुरुजी बाल उद्यान बांधण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी या ठिकाणी कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र नियोजित एक वर्षांच्या कालावधीत या उद्यानाचे ७० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. याबाबत प्रशासनाने आणि राजकीय नेत्याने मौन धारण केल्यामुळे या कामात नेमके दडलंय काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या दिद्या परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साने गुरुजी बाल उद्यान साकारण्यात येत आहे. या उद्यानाच्या विषयावरून महासभेत अनेकदा गदारोळही झाला होता. तर निविदा प्रक्रियेच्या लांबणीनंतर दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्चून या उद्यानाचे काम करण्यास मंजुरी देण्यात आली. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या उद्यानाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ऐरोली मतदारसंघात साकारणारा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम पालिका आणि ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे रखडला आहे. या उद्यानांच्या कामासाठी सल्लागार कंपनीला ठेकेदाराने नियोजित केलेली रक्कम वेळेत न दिल्याने सदरचे काम रखडले आहे. महानगरपालिकेच्या या उद्यानाची निर्मिती करताना या ठिकाणी लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र, सानेगुरुजीचे तलचित्र त्याचबरोबर सुंदर सजावटीतील प्रवेशद्वार अशा दिवास्वप्नांचे उद्यान दाखविले होते. या ठिकाणी असणारे सुलभ शौचालय हटवण्याचे नियमानुरूप असताना देखील सदरचे शौचालय त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याने या उद्यानाला शौचालयाचा अडसर निर्माण झाला आहे. ठेकेदाराने आवश्यक असणाऱ्या बांधकाम साम्रगीचे वेळोवेळी पूर्तता न केल्याने यांचे काम लांबणीवर पडले आहे. शहरासाठी भूषणावह ठरणाऱ्या आणि साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या बाल उद्यानाचे काम रखडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यांसदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता तरंग तलावातील प्रस्तावित कामापैकी दोन कामे रद्द करण्यात आली असून सदरच्या ठिकाणी शौचालय हटविले जाणार नाही. तसेच उद्यानाचे काम आणखी काही महिने लांबणीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.