राष्ट्रपुरूषांचा इतिहास आणि आदर्शाचे गोडवे गायचे. प्रसंगी चिथावणीखोर व्यक्तव्य करत इतिहासाची सरमिसळ करायची यापेक्षा राष्ट्रपुरूषांच्या आदर्श अंगीकारत प्रत्यक्ष कृतीवर भर देणारे आपल्याकडे बोटावर मोजण्या इतकेच आहेत. मावळा प्रतिष्ठानच्यावतीने असेच विधायक काम सुरू असून शिवरायांचे विचार सर्वदूर पोहचावे, खरा इतिहास, शिवकार्य लोकांना माहिती व्हावे यासाठी गड संवर्धन, स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. रविवारी प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी रामशेज किल्लावर स्वच्छता मोहीम राबविली. १५० हून अधिक मावळ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदवत रामशेज किल्ल्यास स्वच्छतेचा नवीन साज चढविला.
साधारणत दीड वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील विविध शिवकालीन किल्लाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्ग संवर्धनासोबत परिसर स्वच्छतेवर या माध्यमातून भर देण्यात येत आहे. आतापर्यंत प्रतापगडावर दिपोत्सव, शिवनेरी दुर्ग संवर्धनासह वेगवेगळे उपक्रम केले जात आहेत. प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी सभासद एकत्र येऊन दुर्ग संवर्धन तसेच स्वच्छता मोहिमेवर निघतात. त्यात शिस्त काटेकोरपणे पाळली जाते. कोणत्याही सभासदाने व्यसन केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. गड चढताना जोक अथवा वैयक्तीक चर्चा न करता केवळ घोषणा देणे, ही सहल नसून छत्रपतींचा वारसा जपण्याचे शिवकार्य या भावनेतून सर्वानी काम करण्याची जाणीव प्रतिष्ठान करून देते. या उपक्रमांतर्गत रविवारी सभासदांनी सकाळीच किल्ला चढण्यास सुरूवात केली. किल्ला परिसराची पर्यटकांमुळे झालेली दुरावस्था, प्राचीन मंदिराला आलेली अवकळा दूर करण्यासाठी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गडावर १९ ऐतिहासिक प्राचीन कुंडे आहेत. या कुंडय़ात पावसाळ्यातील पाणी जमा झाले आहे. या कुंडय़ात शेवाळ तयार झाले असून पर्यटकांकडून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून या कुंडय़ामध्ये पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची रिकामी पाकीट यासह मद्याच्या काही बाटल्या टाकण्यात आल्या होत्या. ही कुंडे स्वच्छ करत काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने तेथे व्यवस्था करण्यात आली. गडावर आणि गडाखाली रामशेजची ऐतिहासिक माहिती देणारा आणि त्याच्या शौर्याचे महत्व पटवून देणारे मोठय़ा आकारातील दोन फलक लावण्यात आले.
तसेच सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरावर रंगकामासाठी मदतीचे आवाहन, मंदिराचे कायमस्वरुपी पावित्र्य राखावे अशा आशयाचे फलक परिसरात उभारण्यात आले. तसेच, गडावरील राम मंदिरात देवांचे नवीन कपडे, पंचारती, घंटी देवून मंदिरावर कायमस्वरूपी भगवा फडकेल, अशी व्यवस्था करण्यात आली.
 शिवराय, संभाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर जात आहे. यामुळे काही ठिकाणी द्वेष निर्माण होत आहे. लोकांपर्यंत खरा इतिहास जावा यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील असल्याचे प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले. या मोहिमेत संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव, विजय साबळे, रजनीकांत पाटील, ओमकार आहेर यांच्यासह नांदेड, सातारा, सांगली, पुणे, परभणी, नाशिक, मुंबईसह इतर ठिकाणाहून सभासद मोहिमेत सहभागी झाले होते.