संजय निरुपम यांनी मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत वर्चस्व असलेल्या देवरा गटाला शह बसला आहे. कामत गटाला न दुखावता आपला दबदबा निर्माण करण्यासाठी संजय निरुपम यांनी हळूहळू पालिकेत आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याची खेळी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिका व बेस्ट समितीत असलेल्या देवरा गटाच्या पदाधिकाऱ्यांना दूर करून निरूपम यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास काँग्रेस नगरसेवकांना सांगण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत मुरली देवरा आणि गुरुदास कामत या दोघांच्या समर्थक नगरसेवकांचे गट कार्यरत होते. या दोन्ही गटांचे नगरसेवक अधूनमधून परस्परांना शह-काटशह देत होते. मात्र मुरली देवरा यांच्या निधनानंतर त्यांचे समर्थक नगरसेवक दिशाहीन झाले आहेत. याचा फायदा मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या संजय निरुपम यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
कामत गटातील काही नगरसेवकांना हाताशी धरून संजय निरुपम यांनी राजकारण सुरू केले आहे. सत्ताधारी निधी देत नसल्याचे निमित्त करून काँग्रेस नगरसेवक सभागृहात शिवसेनेच्या विरोधात गोंधळ घालू लागले आहेत, तर दुसरीकडे देवरा गटाचे खच्चीकरण सुरू करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेमध्ये निरीक्षक म्हणून कामत गटातील अमरजित सिंह मनहास आणि राजहंस सिंह यांच्याबरोबरच देवरा गटाचे किसन जाधव व उपेंद्र दोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता किसन जाधव आणि उपेंद्र दोशी यांना निरीक्षकपदावरून दूर करण्यात आले असून, संजय निरुपम यांनी आपले समर्थक अस्लम शेख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
 मुरली देवरा यांच्या तालमीतच तयार झालेले प्रमोद मांद्रेकर यांनाही बेस्ट समितीवरून हटविण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये राजकारणाने वेग घेतल्यामुळे एकेकाळी मुरली देवरा यांच्या पाठबळामुळेच विरोधी पक्षनेतेपदाची माळ गळ्यात पडलेले ज्ञानराज निकम यांना आता स्थायी समितीच्या सदस्यपदालाही मुकावे लागले आहे.
एकनाथ गायकवाड यांचे समर्थक रवी राजा, नसिम खान यांचे समर्थक मोहम्मद गौस यांची बेस्ट समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बेस्ट समितीचे सदस्यत्व भूषविणारे गौस वर्षभरातील समितीच्या ३३ पैकी केवळ ३ बैठकींना उपस्थित होते, तर निरुपम यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजंता यादव यांना शिक्षण समितीबरोबरच सुधार समितीचेही सदस्यत्व बहाल केले आहे.
नवी दिल्लीमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या प्रिया दत्त यांच्या समर्थकांनाही निष्प्रभ करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मलईदार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधार समितीमधून प्रिया दत्त यांच्या कट्टर समर्थक विनी डिसोझा यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. ओरड होऊ नये म्हणून विनी डिसोझा यांना शिक्षण समितीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. प्रिया दत्त समर्थक इतर नगरसेवकांना समित्यांच्या सदस्यपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे काँग्रेसचे काही नगरसेवक नाराज झाले आहेत.