ठाणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांचा दारुण पराभव नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून मोदी लाटेत नाईक यांचा पराभव झाला यापेक्षा नवी मुंबईतून ४८ हजाराचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना मिळाल्याचे मोठे दु:ख या कार्यकर्त्यांसह नाईक कुटुंबीयाला आहे. त्यामुळेच रविवारी झालेल्या चिंतन बैठकीनंतर ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावल्याची’ एका कार्यकत्याने दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी आहे.
लोकसभेची निवडणूक निर्विवाद पार पडून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून उदय झाला आहे. या निवडणुकीचे कवित्व अद्याप सुरू असून पालकमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी कोपरखैरणे येथील त्यांच्याच रा. फ. नाईक विद्यालयात एक बैठक घेतली होती. त्यात नाईक यांनी निवडणुकीत जय-पराजय हा चालतच असल्याची भावना व्यक्त केली. कोणत्याही अडथळ्यानंतर नदी आपले वाहत रहाणे सोडत नाही, त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी सामाजिक सेवा करीत राहणे सोडू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
नवी मुंबईत ३५ हजारांपेक्षा जास्त गुजराती मतदार राहात आहेत. गुजराती समाजाने या वेळी भाजपच्या मित्रपक्षांचा उमेदवार कोण आहे हे न पाहता केवळ मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी त्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे कोणत्याही जाती, धर्मावर आकस न ठेवता यापुढे काम करीत राहण्याचे अभिवचन नाईकांनी या वेळी दिले. या सभेला आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे चेहरे पडलेले दिसून येत होते. एक कार्यकर्ता तर धाय मोकळून रडत असल्याचे देखील दृश्य होते. त्यामुळे या सभेवर एक प्रकारची शोककळा पसरल्याचे चित्र होते.
मोदी लाटेत भल्याभल्यांच्या दांडय़ा गुल झालेल्या आहेत. त्यात केंद्रीय गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांचाही अपवाद नाही. त्यामुळे नाईकांची जागा हातून गेल्याचे दु:ख त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढे नाही. त्यापेक्षा विचारे यांना दोन लाख ८० हजारांचे मताधिक्य मिळणे आणि नवी मुंबई व भाईंदर या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळल्याचे चित्र उभे राहणे याचे आहे.
नवी मुंबई हा नाईकांचा बालेकिल्ला मानला जात होता. मागील निवडणुकीत याच नवी मुंबईतून मिळालेल्या ३३ हजारांच्या मतधिक्यावर संजीव नाईक यांनी शिवसेनेची ही जागा पदरात पाडून घेतली होती. त्याच्या उलट या वेळी झाले असून विचारे यांना ४८ हजारांचे मताधिक्य या नाईकांच्या राज्यात मिळालेले असल्याने नाईक कुटुंब चांगलेच धास्तावलेले आहे. मोदी लाटेमुळे विचारे यांना लाख दीड लाखांचे मताधिक्य मिळणे समजण्यासारखे आहे, पण त्याच्या दुप्पट मताधिक्य मिळाल्याने नाईकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तरीही कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून नाईकांनी त्यांना पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. खासदारकीपेक्षा आता चिंता दोन आमदारकी व पालिका वाचविण्याची आहे.
महायुतीला मिळालेले यश पाहता आघाडीच्या संभाव्य उमेदवारांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे विचारे यांच्या विजयात आपला विजय दडला असल्याचे समजणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी शुक्रवारनंतर ओल्या पाटर्य़ाचा धुमधडाका लावला आहे. विधानसभा व त्यानंतर सहा महिन्यांनी येणाऱ्या पालिकेत हा मोदी ट्रेड सारखा राहिला तर नाईकांच्या हातातून नवी मुंबईची सुभेदारी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या बाबतीत झाली असून आता ठिगळ कुठे मारायचे याची चिंता लागली आहे. यात संजीव नाईक यांना मागील तीन निवडणुकीत पडलेली मते ही जास्त नसल्याचे दिसून आले आहे.
प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नाईक यांना तीन लाख ७१ हजार मते पडली होती तर त्यानंतर झालेल्या १५व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तीन लाख एक हजार मतांची बिदागी नाईक यांच्या पदरात पडलेली आहे. या वेळी मतदान टक्केवारी वाढूनही नाईक यांना केवळ तीन लाख १५ हजार मते मिळालेली आहेत. त्यामुळे नाईकांना मिळणाऱ्या मतांमध्ये तीन निवडणुकीत फारशी वाढ झाली नसल्याचे दिसून येते.
मोदी लाट, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नाराजी यांसारखे देशपातळीवरील मुद्दे नाईकांच्या विरोधात गेले आहेत हे जगजाहीर आहे, मात्र घराणेशाही, क्लस्टरचे भूत, वाढीव एफएसआयचा प्रश्न, आजूबाजूच्या गोतावळ्याची चहापेक्षा किटली गरम असल्याची कार्यकर्त्यांबरोबरची वागणूक, चांगल्या सल्लगारांचा अभाव, सरकारी बाबूची मानसिकता कायम असलेले सहकारी अधिकारी, कणखरपणाची कमतरता, टक्केवारीचे आरोप, पदाधिकाऱ्यांच्या रूपात न फिरवलेली भाकरी, कार्यकर्त्यांच्या नवीन फळीची वानवा, अति दानशूरता यामुळे नाईक कुटुंबीयांच्या विरोधात हे मताधिक्य गेल्याचे दिसून येत आहे.