स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमेटीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यातील वाहने अडवून त्यांचा निषेध केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे कामठी मार्गावरील लांबा सेलिब्रेशनच्या सभागृहात आयोजित बुथ एजंटच्या मेळाव्यात हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सकाळी १०.४५ ला नागपूर विमानतळावर पोहोचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
विमानतळावरून थेट कार्यक्रमस्थळी जात असताना इंदोरा चौकात विदर्भ जॉइंट अ‍ॅक्शन कमेटीचे पदाधिकारी अहमद कादर यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र उर्वरित काफिला कार्यकर्त्यांनी रोखून धरल्यामुळे या भागात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व कार्यकर्ते घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडून बसले असताना पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्या सर्वाना बाजूला केले. यानंतर उर्वरित काफिला समोर निघाला. अडवलेल्या काफिलामध्ये प्रदेशाध्यध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची गाडी असल्यामुळे त्यांना काही वेळ थांबावे लागले. मुख्यमंत्र्याच्या कारमध्ये नितीन राऊत आणि राजेंद्र मुळक बसले होते. ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होते तेथून काही अंतरावर मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी उत्तर नागपुरातील काँग्रेसचे कार्यकर्ते उभे होते. मुख्यमंत्री गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले आणि पुन्हा गाडय़ाचा काफिला कार्यक्रमस्थळी निघाला.
मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. यापुढे ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री नागपुरात येतील त्यावेळी त्यांचा अशाच पद्धतीने विरोध करून निदर्शने करण्यात येईल, असा इशारा कादर यांनी यावेळी दिला. यावेळी माजी आमदार भोला बढेल, ग्वालिअस पीटर, तनहा नागपुरी, रामेश्वर मोहबे, सुनील खंडेलवाल, रोशन हिरणवार, आशा पाटील, किरण खंडाईत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.