माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या शनिवारच्या तालुका दौऱ्यात आमदार भाऊसाहेब कांबळे हे सहभागी होणार असले तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे मात्र अनुपस्थित राहणार आहेत. विखे व ससाणे यांच्यात राजकीय मतभेद वाढल्याने कार्यकर्त्यांची मात्र कुचंबना होत आहे.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विखे तालुका दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी सकाळी ११ वाजता पढेगाव व दुपारी दोन वाजता टाकळीभान येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात दुष्काळ, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीज बिल माफी व पीक कर्जमाफीचा आढावा घेतला जाणार आहे. मेळाव्यास बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, माजी सभापती नानासाहेब पवार, रामभाऊ लिप्टे, गिरीधर आसणे उपस्थित राहणार आहेत. खंडकरी शेतकऱ्यांची बैठकही विखे यांनी आयोजित केली
आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विखे यांनी ससाणे यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. तसेच मायाताई कोळसे यांना पाठिंबा दिला होता. खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाच्या प्रश्नावर ससाणे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर विखे व ससाणे यांच्यातील राजकीय वाद चव्हाटय़ावर आले. ससाणे यांनी आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याऐवजी मौन बाळगले. विखे यांच्या दौऱ्यात सहभागी व्हावे, अशी सूचना ससाणे यांना विखे समर्थकांनी केली होती. पण ती ससाणे यांनी फेटाळून लावली असून विखे यांच्या दौऱ्यापासून ते दूर राहणार आहेत. विखे समर्थक गेल्या १५ वर्षांपासून स्थानिक पातळीवरील राजकारणात ससाणे यांच्याबरोबर आहेत. आता या कार्यकर्त्यांची मोठी कोंडी सुरू झाली असून आगामी निवडणुकांमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. बाजार समिती व अशोक कारखान्याची निवडणूक लवकरच होणार आहे.
खंडकरी शेतकऱ्यांची बैठक बेलापूर येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत खंडकऱ्यांचा जमीन वाटपाचा प्रश्न सोडविण्यात ससाणे यांना यश आले. हे यश सहन होत नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, असे आरोप करण्यात आले. जमीन वाटप लवकर मार्गी लागावे म्हणून आता महसूलमंत्री थोरात यांच्याकडे शिष्टमंडळ नेण्यात येणार आहे. बैठकीस अण्णासाहेब थोरात, अरूण नाईक, सुधीर नवले, दत्ता कुऱ्हे, ज्ञानदेव वाबळे, त्रिंबक कुऱ्हे, प्रकाश नाईक, राजेंद्र सातभाई, बंटी शेलार आदी उपस्थित होते. विखे यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व दिले जात आहे.