‘घरगुती गॅसचा अतिरिक्त वापर टाळा, इंधन वाचवा आणि बचत वाढवा,’ अशी घोषणा शनिवारी ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी शहरवासीयांना दिली. भारत गॅस आणि भारत पेट्रोलियम या दोन कंपन्यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. नौपाडय़ातून या शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली रॅली राममारुती रोड येथून स्वामी समर्थ चौकातून पुन्हा शाळेच्या प्रांगणात दाखल झाली. या उपक्रमामध्ये भारत गॅस आणि भारत पेट्रोलियमचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 

स्थापना दिनानिमित्ताने भारत गॅस कंपनीतर्फे सध्या तेल आणि वायू बचत पंधरवडा साजरा केला जात आहे. इंधन बचत मोहिमेविषयी जनजागृती करणे हा या रॅलीचा हेतू होता. कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग त्यादृष्टीने घरोघरी जाऊन जागृती करत आहेत. त्याच बरोबरीने शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ठाणे, नवी मुंबईतील अधिकारी, वितरक आणि शालेय विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मुलांच्या मनावर इंधन बचतीचा संदेश बिंबविण्याच्या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘इंधन वाचवा..बचत वाढवा’ अशा सूचनांचे फलक हाती घेतले होते. रॅलीच्या समारोपप्रसंगी सुनील धकाते यांनी इंधन बचतीचे महत्त्व सांगून ऊर्जा बचतीच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली चव्हाण, गॅस वितरक प्रकाश मंडलिक आणि भारत गॅसचे विक्री अधिकारी समर्थ दर्देकर उपस्थित होते.