ऊर्जानिर्मिती, पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी यंत्रणा, वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आधुनिक यंत्रणा, वर्षां जलसंचयन हे विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजून देणारे वैज्ञानिक प्रकल्प अंबरनाथमधील फातिमा हायस्कूलमध्ये भरलेल्या विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या परिषदेमध्ये अंबरनाथ तालुक्यातील २३२ शाळांनी आपले विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये व्यायाम, कपडे धुण्याचे यंत्र आणि मोबाइल बॅटरी चार्ज करणारी सायकल ही साधने बहुतेकांच्या आकर्षणाचे केंद्रिबदू ठरली.  
अंबरनाथ तालुका पंचायत समिती आणि फातिमा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील शाळांनी मोठा प्रतिसाद दिला. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थाना प्रयोग करण्याची प्रत्यक्ष संधी मिळत असल्याने त्यांच्या कल्पकतेला आणि कौशल्याला मोठा वाव मिळाल्याचे दिसून येत होते. शहरातील या प्रदर्शनातूनही अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. या सर्वात सर्वाच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली ती व्यायाम तसेच कपडे धुण्याचे यंत्र आणि मोबाइलची बॅटरी चार्ज करणारी सायकल. ही सायकल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. माध्यमिक विद्यार्थ्यांच्या एका गटाने ही सायकल तयार केली होती. सायकल चालवल्याने व्यायाम होतो. मात्र त्याचबरोबर ती चालवल्यानंतर त्याच्यासोबत जोडलेल्या यंत्रामध्ये कपडे धुण्याची प्रक्रियाही पूर्ण होत होती, तर एका सर्किटच्या मदतीने मोबाइल चाìजगचे काम एकाच वेळी करण्यात येत होते.
पहिली ते आठवी, नववी ते बारावी आणि शिक्षक असे तीन गटांनी प्रकल्प सादर केले होते. या प्रदर्शनात शिक्षकांच्या प्रकल्पांची संख्या मोठी होती. पहिल्या गटात १३९, दुसऱ्या गटात ७२ तर शिक्षकांच्या गटात २१ प्रकल्प सादर करण्यात आले होते. पालिका जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांनी त्यात भाग घेतला. यंदाच्या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रकल्पांच्या प्रदर्शनाच्या बाहेरील बाजूस भारतीय वैज्ञानिकांची ओळख करून देणारे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, गटशिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, फादर इर्सूल डिसूझा आदी मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन बाल वैज्ञानिकांचे कौतुक केले.