आकाशातून विमानासारखे उडणारे, पण तबकडीसारखे दिसणारे ‘ड्रोन’ अलीकडे अनेक जाहिरातीत दिसून येतात. कधी त्या ‘ड्रोन’मधून पिझ्झा येतो तर कधी आणखी काही वस्तू त्यातून आणली जाते. दुसऱ्याच एका मोबाईलच्या जाहिरातीत एका सर्वसाधारण व्यक्तीचा मुलगा केवळ मोबाईलमधील अ‍ॅप्सच्या माध्यमातून ‘ड्रोन’ तयार करतो आणि त्याचे ते संशोधन जगभरात नावाजले जाते. याच्याशीच साधम्र्य साधणारा प्रकार गुरुवारी प्रत्यक्षात रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात अनुभवायला मिळाला. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या संशोधनातून तयार झालेले माणसाच्या अंगावर पांघरली जाणारी रिमोटसदृश्य झालर, कबाड से जुगाड असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी आहेत.
वायसीसीईचे निलय इंदूरकर व तारिकेश धारणे या भावी संशोधक अभियंत्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘ड्रोन’ आकाशात उडायला लागले आणि एकच गर्दी जमली. सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या ‘ड्रोन’ची क्षमता जास्तीतजास्त सहा मिनिटे उडण्याची आहे, कारण त्याला चार्जिगसाठी खाली उतरवावे लागते. मात्र, निलय आणि तारिकेश यांनी तयार केलेले ‘ड्रोन’ आकाशात उडत असतानाच चार्ज होऊ शकते. ‘ड्रोन’ जमिनीवर उतरताना खाली आपटून पडू नये म्हणून चाकांसह त्याला रबरी बॉलचा आधार या विद्यार्थ्यांनी दिल्याने ते अधिक सुरक्षित आहे. खाणींमध्ये किंवा तोकडय़ा जागेत जिथे माणसे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी या ‘ड्रोन’चा अलगद वापर करून घेता येऊ शकतो.
सर्वसाधारण माणूस जास्तीतजास्त ५० किलो वजन उचलू शकतो. कित्येकदा औद्योगिक क्षेत्रात जिथे यंत्राच्या माध्यमातून सामान नेणे कठीण होते, त्यावेळी अनेकदा माणसालाच त्या सामानाची ने-आण करावी लागते. कित्येकदा हे सामान उचलणेसुद्धा कठीण होते. अशाच कामगारांसाठी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला मानवी साचा सर्वाच्याच कुतुहलाचा विषय ठरला आहे. औद्योगिक क्षेत्रात अत्यंत उपयोगी ठरणारा हा मानवी साचा एकदा का माणसाच्या अंगावर चढवला की कितीही जड वस्तू तयार करू शकतो. असाच मानवी साचा आता शारीरिकदृष्टय़ा हतबल असणाऱ्यांसाठी तयार करण्याचा मानस या विद्यार्थ्यांचा आहे.
रेल्वेने प्रवास करताना कित्येकदा गाडी रेल्वेस्थानकावर थांबल्यानंतर शौचालयाचा वापर करू नये अशी सूचना असतानाही प्रवासी वापर करतात. रेल्वे स्थानकावर घाण होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे, पण प्रवाशांना हे कोण सांगणार? किड्स रामटेकच्या विद्यार्थ्यांनी त्यावर आता उपाय शोधला आहे. रेल्वेतील शौचालयाखाली घाण जमा करण्यासाठी ट्रॉली लावली असून गाडी स्थानकावर थांबली तरी घाण स्थानकावर सांडणार नाही आणि गाडी जशी धावू लागेल, तशी ती टँक आपोआप रिकामी होईल. रेल्वे खात्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा प्रकल्प नितीन वरुडकर, कल्याणी चौधरी आणि रुपेश वझे या विद्यार्थ्यांनी तयार केला.
औद्योगिक क्षेत्र असो वा इतर क्षेत्र, ज्या क्षेत्रात मोठमोठे पाईप वापरले जातात त्या ठिकाणी कित्येकदा पाईपमधून गळती होते किंवा त्याला तडे जातात. अनेकदा अपघाताचा धोका संभवतो. मात्र, त्या पाईपचा वापर करण्याआधी किंवा वापर सुरू असताना आकाराने कमी जास्त होणारा कॅमेरा लावलेला रोबोट त्या पाईपमध्ये जाऊ द्यायचा.
रोबोटला लावलेला कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या पाईपमधून होणारी गळती आणि इतर बाबी संगणकावर दिसतील. यामुळे होणारा अपघातही टाळता येईल. किड्स रामटेकच्याच मिथिलेश सोनकुसरे व मयुर कुकसे या विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रकल्प औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून सर्व भारतीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. याची सुरुवात घरापासूनच कशी करता येईल आणि घरातून निघणाऱ्या कचऱ्याचा योग्य वापर कसा करता येईल याचा पाठ शिवाजी सायन्सच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रयोगातून घालून दिला. विघटनशील, अविघटनशील आणि प्लास्टिक असा तीन प्रकारचा कचरा घरातून बाहेर पडतो. हा सर्व कचरा वेगवेगळा क्रश करून त्यापासून त्यापासून वीज, इंधन त्यांनी तयार केले आहे. प्लास्टिकसुद्धा क्रश करून आणि फ्लाय अ‍ॅश एकत्र करून डांबरीकरणालाही मात देणारे रस्ते तयार करता येऊ शकतात, हे त्यांनी प्रयोगातून दाखवले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने रामन विज्ञान केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी पार्कच्या संयुक्त विद्यमाने ‘नागपूर विज्ञान व अभियांत्रिकी प्रदर्शन २०१५’ आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.