स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीबाबत ‘मरे’चे सिडकोला पत्र
मुंबईतील गर्दीला पर्याय म्हणून नवी मुंबईकडे पाहत असताना आता हे शहरही विस्तारत चालले आहे. याच विस्तारीणकरणातील एक टप्पा असलेल्या सीवूड-उरण या रेल्वेमार्गाच्या पूर्ततेआड या मार्गावरील अद्याप अस्तित्वातही न आलेल्या स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न उभा राहिला आहे. सिडको बांधत असलेल्या या स्थानकांचा खर्च सिडकोने या स्थानकांच्या विकासातूनच उभा करावा आणि त्याचा भार प्रवाशांवर टाकू नये, अशी विनंतीवजा सूचना करणारे पत्र मध्य रेल्वेने सिडकोकडे पाठवले आहे. मध्य रेल्वे, राज्य सरकार आणि सिडको यांच्या सहकार्यातून होणाऱ्या या प्रकल्पातील या समस्येबाबत आता सिडको आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, यावर या प्रकल्पाच्या पूर्ततेचे भवितव्य अवलंबून आहे.
नवी मुंबई हद्दीत सिडकोने बांधलेल्या सर्वच स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चापोटी सिडको मध्य रेल्वेकडून शुल्क वसूल करते. त्यासाठी हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांकडून देखभाल-दुरुस्ती अधिभारही घेतला जातो. या प्रकरणावरून सिडको आणि मध्य रेल्वे यांच्यात वादही झाला होता. त्यानंतर गेल्या दीड-दोन वर्षांपासून याबाबतच्या बठका सुरू असून त्यातूनही काहीच निष्पन्न झालेले नाही.
दरम्यान, सीवूड-उरण रेल्वेमार्गाची उभारणी सिडको आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्यातून होत आहे. या प्रकल्पाचा एकतृतीयांश खर्च मध्य रेल्वे करत असून उर्वरित भार सिडको उचलणार आहे. २२.२९ किलोमीटरच्या या मार्गावर पहिल्या टप्प्यात सीवूड, किल्ले, तारघर, बामनडोंगरी, खारकोपर, घावन अशी पाच स्थानके आहेत. या स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सिडकोने या स्थानकांच्या विकासातूनच करावा, अशी सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी पत्राद्वारे सिडकोला केली आहे. या स्थानकांचा व्यावसायिकदृष्टय़ा विकास करून २० वर्षांच्या कराराद्वारे त्यातून मिळणारी रक्कम स्थानकांच्या देखभालीसाठी वापरण्यात यावी, असा पर्याय ब्रिगेडिअर सूद यांनी दिला आहे.
यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांना स्थानकांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च तिकिटांच्या माध्यमातून उचलावा लागणार नाही. तसेच सिडकोलाही ही स्थानके उत्तमरीत्या सांभाळणे शक्य होईल. यात सिडको, प्रवासी आणि रेल्वे या तिघांचाही फायदा आहे, अशी भूमिका मध्य रेल्वेने घेतली आहे. सध्या सीवूड स्थानकाचे काम जोरात चालू आहे.
सीवूड-उरण रेल्वेमार्ग तयार झाल्यावर सीवूड स्थानकाला प्राप्त होणारे महत्त्व लक्षात घेऊन सध्या या स्थानकाची उभारणी केली जात आहे. येथे व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे. याच धर्तीवर इतर स्थानकांचाही विकास करावा, असे मध्य रेल्वेने सुचवले आहे. याबाबत आता सिडको निर्णय घेणार आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकार व सिडको काय निर्णय घेते, याकडे मध्य रेल्वेचे लक्ष आहे.