कळमनुरी तालुक्यातील येलकी शिवारात सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पसाठी ७७ एकर जमिनीचे हस्तांतरण झाले असून राज्यपालांच्या आदेशाने सहसचिव आय. एस. मोरे यांनी जमीन हस्तांतरणासंदर्भात अधिसूचना काढली आहे. लवकरच सीमा सुरक्षा दलाचा कॅम्प उभारण्यात येईल व त्याचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती आमदार राजीव सातव यांनी दिली.
सीमा सुरक्षा दलातील जवानांना प्रशिक्षण केंद्र सुरू करता यावे, यासाठी सुरक्षा दलाच्या वतीने राज्य सरकारला ५३ लाख रुपये देण्यात आले होते. येलकी शिवारातील सर्वे क्रमांक ११२ मधील ३० हेक्टर जमीन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ७७ एकर जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल अशा देशपातळीवर महत्त्वाचे समजले जाणारे दोन विभाग कळमनुरीत सुरू होतील. हे प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे म्हणून आमदार राजीव सातव यांनी प्रयत्न केले होते. या प्रशिक्षण केंद्रामुळे अर्थचक्र गतिमान होईल, असा दावा आमदार सातव यांनी पत्रकार बैठकीत केला.