लोकसभा निवडणुकीत विदर्भातील १० पैकी किमान नऊ जागांवर भाजप-सेना युतीचा भगवा फडकेल, असे संकेत सट्टा बाजारातील बुकींच्या आकडेवारीवरून मिळतात. यात भंडारा-गोंदिया मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील. नागपूर भाजपकडे आणि रामटेक सेनेकडे, वर्धा काँग्रेसकडून भाजपकडे आणि भंडारा-गोंदिया राष्टवादी काँग्रेसकडे राहील, असा बुकींचा अंदाज आहे.
देशात असलेली नरेंद्र मोदींची लाट आणि जनमत चाचणीने दिलेल्या अंदाजानंतर सटोडियांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला झुकते माप दिले आहे. त्यामुळे एरवी आक्रमक असणारे बुकी आणि सटोडियेदेखील यावेळी मवाळ झाले आहेत. कल कोणाच्या बाजूने लागेल, याचा अंदाज घेता घेता ते घायकुतीला आलेले असताना जनमत चाचणीनंतर मात्र सर्व समीकरणे बदलली आहेत. अंदाज चुकला तर चालतो पण, फटका कमी बसावा, याची खबरदारी त्यांचे पंटर घेत आहेत. यामुळे सध्या त्यांचे लक्ष क्रिकेटच्या आयपीएलऐवजी इंडियन पोलिटिकल लीगकडे लागले आहे. मात्र, असे असले तरी क्रिकेटवर सट्टा खेळण्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला आहे. कारण, आयपीएल रोजच असल्याने गेल्या वेळच्या तुलनेत यंदा निवडणुकीत सट्टा कमी लावण्यात आला आहे. यावेळी सुमारे ६० ते ७० कोटी रुपयांचाच सट्टा लागला असल्याचा अंदाज संबंधित सूत्रांनी व्यक्त केला.
विदर्भातून एक केंद्रीय मंत्री आणि एक माजी मंत्री भाग्य आजमावत आहेत. यातील एका माजी केंद्रीय मंत्र्याला धक्का बसेल, असे भाव आहेत. नागपूरमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांचा भाव सुरुवातीपासून ३० ते ३५ असून तो कायम आहे. तर काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या भावामध्ये सातत्याने वाढ होत असून सध्या ५ रुपया १० पैशावर ते गेले आहेत.
आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया आणि बसपाचे मोहन गायकवाड यांचा भाव ६ आणि ८ रुपये आहे. रामटेकमध्येही अशीच स्थिती आहे. काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा भाव प्रारंभीपासून चांगला नसल्याचे बोलले जात आहे. प्रारंभी त्यांचा भाव २ रुपये होता तो आता ४ रुपये १० पैशावर गेला आहे. या तुलनेत सेनेचे कृपाल तुमाने यांचा भाव ५० पैसे आहे.
विदर्भात भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे उमेदवार नाना पटोले यांच्यामध्ये चांगली लढत असून दोघांच्या भावामध्ये फारसा फरक नाही. पटेल यांचा ५० पेसै तर पटोले यांचा ७० पैसे ठेवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही समाधानाची बाब असली तरी वेळेवर फासे कसे पलटतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. वध्र्यामध्ये सागर मेघे यांचा ३ रुपये १० पैसे तर रामदास तडस यांचा ८० पैसे भाव आहे. अमरावतीत सेनेचे आनंदराव अडसूळ यांचा भाव ४५ पैसे तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांचा भाव २ रुपये आहे.
अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचा भाव धाबे दणाणणाराच म्हणजे २ रुपये ७५ पैसे आणि भारिप-बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल ५ रुपये ५० पैसे आहे. भाजपचे संजय धोत्रे यांचा भाव फक्त ३५ पैसे आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात सेनेच्या भावना गवळी यांचा भावही फक्त ३० पैसे असून काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा भाव ३ रुपये आहे. बुलढाण्यात सेनेचे प्रताप जाधव यांचा ६५ पैसे तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णराव इंगळे यांचा भाव १ रुपया २५ पैसे आहे. गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांचा भाव ७० पैसे तर, काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांचा भाव २ रुपया १५ पैसे आहे. विदर्भात भाजपला १० पैकी ९ जागा मिळतील यावर ४० पैसे भाव सटोडियांनी लावला आहे.