News Flash

ट्राफीज् प्रकरणी दोषींना कारागृहात पाठवण्याची वनमंत्र्यांची भूमिका

मध्य भारतातील एकमेव ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज् गहाळ प्रकरणाची गंभीर दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली.

| November 28, 2014 01:14 am

मध्य भारतातील एकमेव ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज् गहाळ प्रकरणाची गंभीर दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. लोकसत्ताला अलीकडेच दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी या प्रकरणातील दोषींना कारागृहात पाठवू, असे सुतोवाच केले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या वनखात्याच्या त्रिसदस्यीय समितीला अंतिम टप्प्यात आलेली चौकशी आता अधिक सखोलपणे करावी लागणार आहे.
मध्यवर्ती संग्रहालयातील वन्यजीव ट्राफीज् वनखात्याच्या परवानगीशिवाय नष्ट केल्याचे आणि त्याचे मालकी प्रमाणपत्र संग्रहालयाजवळ नसल्याचे प्रकरण सर्वप्रथम लोकसत्तानेच उघडकीस आणले. संग्रहालयातील १२९० पैकी १२३६ वन्यजीव ट्राफीज् जाळून नष्ट केल्याचे वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून उघडकीस आले. हा सर्व प्रकार तत्कालीन अभिरक्षक मधूकर कठाणे यांच्या कार्यकाळात झाला. वन्यजीव ट्राफीज् नष्ट करण्याचे त्यांचे सहीनिशी पत्र लोकसत्ताला प्राप्त झाले. फक्त एवढेच नव्हे तर या ट्राफीज्चे मालकी प्रमाणपत्रसुद्धा संग्रहालयाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात वनखात्याची भूमिकासुद्धा संशयाच्या फेऱ्यात अडकली.
दरम्यान, हे प्रकरण लोकसत्ताने लावून धरल्यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीला कठाणे यांनी असहकार्याची भूमिका घेत कित्येकदा केराची टोपली दाखवली. राज्याच्या पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाने हे प्रकरण केंद्रापर्यंत गेल्यानंतर आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर कठाणे यांची बदली केली. मात्र, या एकाच प्रकरणात कठाणे अडकले नाहीत तर, केंद्राच्या ‘म्युझियम ग्रँड स्कीम’अंतर्गत संग्रहालयाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचे पत्रही त्यांनी गहाळ केले. मात्र, कठाणे यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वनखात्यालाही वारंवार या प्रकरणात विचारणा केली, पण त्यांनीही या प्रकरणी मौन बाळगले.
तब्बल पाच महिने या प्रकरणाला होत आले तरीही वन्यजीव ट्राफीज् चौकशी मात्र तीन सदस्यांच्या बळावरच सुरू आहे. सहाय्यक वनसंरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) बी.एच. वीरसेन, सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. कोलनकर व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते या प्रकरणाच्या चौकशीचा भार सांभाळात आहे. वास्तविकेत या प्रकरणी आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असायला हवा होता. संग्रहालयाच्या आतील गोदाम आणि गॅलरी या समितीने आतापर्यंत तपासली असून गुरुवारला संग्रहालयाचे मुख्य गोदाम तपासण्यात आले. मात्र, त्या पाहणीतून समितीला नेमके काय गवसले हे कळू शकले नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याचे कळते. त्याचवेळी वनमंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची घेतलेली गंभीर दखल वनखात्याच्या ‘मौनी’ भूमिकेवर परिणाम करणार का, हे अंतिम टप्प्यातील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2014 1:14 am

Web Title: serious intervention by forests minister sudhir mungantiwar in wildlife trophy missing matter from museum
टॅग : Museum
Next Stories
1 चंद्रपूर येथे वन अकादमीला मान्यता
2 मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला पक्षश्रेष्ठींचा चाप
3 जिल्ह्य़ातील १७ विद्यार्थ्यांना हृदयरोग
Just Now!
X