सात जूनपासून पावसाळा सुरू होत असून संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता महापालिकेने मान्सूनपूर्व तयारी सुरू केली असून नागनदी व पिवळी नदी व अंतर्गत नाले स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या कक्षात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. शहरातील अनेक इमारतींच्या तळघरात पावसाळ्यात पाणी साचते. ते पाणी उपसण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ होते. ते टाळण्यासाठी यंदा खबरदारी घेतली जात आहे. इमारतींच्या मालकांना तसेच संस्थांना नोटिसा दिल्या जात आहे. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पाणी साचल्यास ते उपसण्याची व्यवस्था संबंधितांना करायची आहे आणि महापालिकेवर वेळ आल्यास त्याचा खर्च वसूल केला जाईल, असे कळविले जात आहे.
अतिखोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा केले जात आहेत. जवळच्या शाळांच्या कुलुपांच्या चाव्या ताब्यात घेतल्या जात आहेत. पाणी तुंबू नये यासाठी नाल्या व नाले स्वच्छ केले जात आहेत. तुंबलेले पाणी मोकळे करण्यासाठी ५० कर्मचारी नियंत्रण कक्षात सज्ज ठेवले जातील. पाणी साचणाऱ्या जागा निश्चित करून तो परिसर स्वच्छ ठेवावा, गटारे स्वच्छ केली जात आहेत. गोरेवाडा व अंबाझरी तलाव तुडुंब भरतात. त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. नाग नदी व पिवळी नदीची स्वच्छता केली जात आहे.
दोन्ही नद्यांच्या पात्रांचे खोलीकरण तसेच प्रवाहातील अडथळे दूर केले जात आहेत. नदी पात्रावरील अतिक्रमणे काढली जात आहेत. रस्त्यावर खोदकामे करण्यास मनाई करण्यात आली आहे. खोदकामे झाली तेथे सपाटीकरण केले जात आहे. जीर्ण इमारती पाडल्या जाणार असून रस्त्यावरील झाडाच्या फांद्या कापल्या जात आहेत. आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत.