पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असताना शहरातील नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. नालेसफाईच्या कामांचा आयुक्त, महापौर आणि आमदारांनी पाहणीदौरा करून समाधान व्यक्त केले होते. प्रत्यक्षात मात्र साफ करण्यात आलेले नालेच त्यांना दाखवून अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली असल्याचे उघड होत आहे. कोपरखरणे आणि घणसोलीला जोडणारा शहरातील मुख्य नाल्यातील गाळ अद्याप काढण्यात आलेला नाही. आपत्कालीन बैठका घेऊन पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याचे आराखडे तयार करत असताना प्रत्यक्षात मात्र शहरात नाले तुंबलेलेच आहेत.
पावसाळापूर्व मान्सूनकामाचा आढावा नवी मुंबई महानगरपालिका मागील महिनाभरापासून घेत आहे. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा त्याचबरोबर शहरातील मोठे नाले स्वच्छ केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक यांनी शहरातील नालेसफाईचा आढावा घेतला. शहरात नालेसफाई समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्रदेखील अधिकाऱ्यांना देऊन टाकले. प्रत्यक्षात मात्र नवी मुंबई शहरातील नाल्याची साफसफाई केल्याचा दिखावा करण्यात आला आहे. उदासीन प्रशासन आणि बेफिकीर कर्मचारी वर्ग यामुळे ठेकेदारीच्या विळख्यात अडकलेली नालेसफाई आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या जिवावर बेतणार आहे.
घणसोली नाला हा शहरातील २०० मीटर रुंदीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नाला आहे. एमआयडीसीमार्गे येणारे कंपन्यांचे पाणी, घणसोली इमारतीतील सांडपाणी, कोपरखरणे सेक्टर परिसरातील पाणी याच नाल्यात सोडले जाते. या नाल्याची आजची अवस्था पाहिल्यास या ठिकाणी नालेसफाई कधी झाली, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या नाल्यात गाळ, कचरा आजही तसाच आहे. या संदर्भात घणसोली विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.