शहरातील डॉ. जाकीर हुसेन उद्यानात खेळणाऱ्या दहा वर्षीय बालिकेचा एका तरुणाने विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. संशयित हा १६ वर्षांचा युवक असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनमुळे शहरातील उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कथडा भागात वास्तव्यास असलेली दहा वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी आपल्या बहिणीसोबत बागेत खेळण्यासाठी गेली होती. यावेळी मजल शेख (१६) या युवकाने तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी संशयिताने दिली. यामुळे भयभीत झालेल्या बालिकेने घरी आल्यावर आईला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालिकेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. संशयित शेख हा कथडा भागात वास्तव्यास असून त्याच्याविरुद्ध विनयभंग व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान महापालिकेने शहरातील अनेक भागात उद्याने साकारली असली, तरी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे टवाळखोरांना बागेत खुले रान मिळत असल्याची नागरिकांची भावना आहे. बहुतांश उद्यानांमध्ये सायंकाळी बच्चे कंपनी व नागरिकांची गर्दी होते. हा कालावधीवगळता इतर वेळी ही उद्याने टवाळखोरांचे अड्डे बनल्याचे लक्षात येते. मद्यप्राशनापासून ते पत्ते खेळण्यापर्यंत असे अनेक उद्योग तिथे सुरू असतात.  सुरक्षारक्षक नसल्याने टवाळखोरांना मोकळे रान मिळते. सकाळ वा दुपारच्या सुमारास बागेत खेळण्यासाठी येणाऱ्या स्थानिक बालगोपाळांना टवाळखोरांचा जाच सहन करावा लागतो. पालिका शाळांप्रमाणे वेगवेगळ्या भागात उद्यानांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडली गेली आहे.  ही बाब विनयभंगासारख्या घटनांना कारक ठरल्याचे दिसते. या घटनेचा बोध घेऊन उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.