येथील कालोजी कापेल्लीवार यांनी तब्बल ७५ मिनिटे व ५ सेकंद शीर्षासन करून उच्चांक प्रस्थापित केला. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने याची नोंद घेतली.
शिक्षक असलेल्या कापेल्लीवार यांनी ७० मिनिटे शीर्षांसन करण्याचा निर्धार केला होता. यापूर्वी त्यांनी एक तासाचा विक्रम केला. कृषी विद्यापीठ मदानावर गुरुवारी सकाळी साडेसात वाजता कापेल्लीवार यांनी शीर्षांसन सुरू केले. जिल्हा क्रीडा अधिकारी सी. व्ही. साखरे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते, जिल्हा योग संघटनेचे सचिव कृष्णा कवडी, डॉ. एन. पी. वाघ, डॉ. केशेट्टी, डॉ. व्यंकटेश कनसल्टवार यांची या वेळी उपस्थिती होती.
कापेल्लीवार यांनी ७ वाजून ४२ मिनिटांनी शीर्षांसन सुरू केले. मन एकाग्र ठेवणे, स्थिरता व संयमाच्या बळावर कुठलीही हालचाल न करता शरीर एकदम स्थिर ठेवत कापेल्लीवार यांनी याआधीचा लिम्का बुकचा ३५ मिनिटांचा विक्रम मोडीत काढला. उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात या विक्रमाचे स्वागत केले. ७० मिनिटे पूर्ण झाल्यानंतर आणखी ५ मिनिटे शीर्षांसन करण्याचे कापेल्लीवार यांनी ठरवले व ७५ मिनिटे ५ सेकंद शीर्षांसन पूर्ण करीत नवा विक्रम नोंदवला. ८ वाजून ५७ मिनिटांनी हा विक्रम त्यांनी पूर्ण केला.
महापौर प्रताप देशमुख, बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे, डॉ. एन. पी. वाघ, मुख्याध्यापक बी. यू. कांबळे यांनी कापेल्लीवार यांचा सत्कार केला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रा. यू. डी. इंगळे, तसेच मुंबई मॅरेथॉन स्पध्रेत चमक दाखविल्याबद्दल धावपटू ज्योती गवते हिचाही सत्कार करण्यात आला.
कापेल्लीवार म्हणाले, की योगासनाचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी हा निर्धार होता. शीर्षांसनाबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न यातून केला. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने दररोज १० मिनिटे शीर्षांसन केले पाहिजे. कापेल्लीवार यांचा विक्रम परभणीकरांची मान उंचावणारा आहे असे वेगवेगळे विक्रम परभणीत व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून कापेल्लीवार यांचा आत्मविश्वास पाहता त्यांनी एवढय़ावरच न थांबता गिनिज बुकात नोंद होण्यासाठी प्रयत्न करावा, असे महापौर देशमुख म्हणाले. रणजित काकडे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन झोडपे यांनी केले.