जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या शिवसेना व मनसे यांच्या स्वतंत्र विषयावरील मोर्चात अंतर्गत दुफळीचे दर्शन झाले. दोन्ही राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत वाद प्रचंड प्रमाणात असल्याचे या मोर्चातून स्पष्टपणे दिसत होते, तर दोन्ही राजकीय पक्षांच्या या मोर्चामध्ये कार्यकर्त्यांचा अभाव प्रकर्षांने जाणवत होता. मनसे व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काढलेल्या या मोर्चात प्रत्येकी कमाल चारशे लोकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती मिळाली. मोर्चा काढण्यासाठी एका स्थानिक नेत्याने सोयाबीनच्या फॅक्टरी मालकांशी घेतलेली गुप्त भेट येथे राजकीय चर्चेचा विषय ठरली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकीवरून मोर्चा काढण्यात आला. या माध्यमातून अकोट येथील शिवसेना आमदार संजय गावंडे यांच्यासह काही लोकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावे वा ते मागे घ्यावे, अशी शिवसैनिकांची मागणी होती. या मोर्चात जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता सेवकराम ताथोड, हरिभाऊ भालतिलक, उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा, शहर प्रमुख तरुण बगेरे, मंजुश्री शेळके, देवश्री ठाकरे यांची उपस्थिती होती. या मोर्चात माजी आमदार गुलाबराव गावंडे यांच्या गटाचे युवा कार्यकर्ते उपस्थित नव्हते, तर शहरातील शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरियाही अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही नेत्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होती. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस व दुफळी येथे स्पष्टपणे उघड झाल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले. शिवसेनेचे अकोट येथील आमदार संजय गावंडे यांच्यावर प्रक्षोभक भाषण प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. निवडणुकीतील स्थानिक मतदार प्रभावित होऊ नये म्हणून एका नेत्याने या मोर्चापासून लांब राहणे पसंत केल्याचे मत विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केले.
अशीच काय ती परिस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची होती. मागणे आंदोलनाच्या माध्यमातून मनसे त्यांचे अस्तित्व दाखविणार होते, पण स्थानिक नेत्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर तांबोळी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करण्याचे ठरविल्याने हे आंदोलन फुसका बार ठरले. या आंदोलनात मनसेत एकोपा नसल्याचे स्पष्टपणे समोर आले. या आंदोलनाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी त्वरित कापूस संकलन केंद्र सुरू करणे, भारनियमन कमी करणे, गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करणे, शेतमालाला रास्त भाव द्या, रस्ता व मुलभूत सोयी सुविधा पुरवा, स्वच्छता व साफसफाई या विविध मुद्यांवर आंदोलन असताना कार्यकर्ते जोडण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आले. मुंबईतून आलेले जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर तांबोळी, जिल्हाध्यक्ष विजय मालोकार, नगरसेवक राजेश काळे, रामा उंबरकार, आदित्य दामले, ललित यावलकर, रणजित राठोड, राकेश शर्मा, सौरभ भगत व अकोला शहर पश्चिम महानगराध्यक्ष संतोष सोनोने यांची उपस्थिती होती, तर अकोला शहर पूर्वचे महानगराध्यक्ष बाप्पू कुळकर्णी यांची मोर्चाच्या ठिकाणी उपस्थिती नव्हती. इतरही अनेक कार्यकर्ते व जुने जाणते नेते मोर्चात सहभागी नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोडी व दुफळी स्पष्टपणे दिसत होती.
या मोर्चाची पूर्वतयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली नव्हती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मोर्चाच्या तयारीच्या नावाखाली येथील एका सोयाबीन फॅक्टरी मालकाशी झालेली गुप्तभेट येथे राजकीय चर्चेचा विषय ठरली.