छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील विश्रामगडावर लवकरच शिवसृष्टी अवतरणार आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवसृष्टीची घोषणा केली. यासाठी तातडीने २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
जालन्याच्या मोहिमेनंतर परतत असताना छत्रपती शिवाजीमहाराजांचे पट्टाकिल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते. त्यांनी तेथे विश्रांती घेतली म्हणून पट्टाकिल्ल्याचे पुढे ‘विश्रामगड’ असे नामांतर करण्यात आले. मागील वर्षांपासून विश्रामगडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो. विश्रामगडाच्या विकासासाठी पिचड यांच्या प्रयत्नाने एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून विश्रामगड परिसर विकासाची विविध कामे सुरू आहेत.
बुधवारी पिचड यांच्या हस्ते गडावरील शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी जाहीर सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर होते. या वेळी बोलताना पिचड म्हणाले, महाराजांच्या या गडावरील वास्तव्याच्या स्मृती जपल्या जाव्यात. गडाचा इतिहास पुढील पिढीला कळावा यासाठी विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत. गडाच्या पायथ्याशी भव्य सभामंडप उभारण्याची तसेच गडावर शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. दरवर्षी येथे शिवजयंतीचा सोहळा मोठय़ा प्रमाणात ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून साजरा करण्यात यावा असे आवाहनही त्यांनी केले.
आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी शिवाजीमहाराज हेच आपले राजे आहेत, असे सांगत इंग्रजी राजवट आम्ही मानत नाही असे इंग्रजांना सुनावले होते व त्यांच्याविरुद्ध मोठा संघर्ष केला. राघोजी भांगरेंचे येथून जवळच असणाऱ्या देवगाव गावी स्मारक  उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युवानेते वैभव पिचड, आदिवासी सेवक मीनानाथ पांडे, शिवाजी धुमाळ, काळू भांगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. एकदरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी विविध कार्यक्रम सादर केले. कासम मनियार यांनी सूत्रसंचालन केले. विलास भरीतकर यांनी आभार मानले.