राज्यात १९७२ पेक्षाही गंभीर दुष्काळी स्थिती असून मराठवाडय़ात तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचीही भीषण टंचाई आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्राकडून ५ हजार कोटींची मदत मिळणे आवश्यक आहे. परंतु केंद्राने केवळ ५५० कोटी दिले आहेत. या तुटपुंज्या मदतीवर दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही. आजपर्यंत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, भूकबळी झाले. या वर्षी पाणीबळी जाण्याची भीती आहे. येत्या काळात दुष्काळाच्या प्रश्नावर मराठवाडय़ातील जनतेच्या वेदना वेशीवर टांगण्याचे काम करणार असल्याचे लोकसभेतील भाजपाचे गटनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी येथे सांगितले.
खासदार मुंडे परभणीत एका विवाहासाठी आले होते. या सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडय़ातील सर्व जिल्हे दुष्काळाने होरपळत आहेत. सतत दोन वर्षे दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जून-जुलैमध्ये केंद्राच्या पथकाने दुष्काळाची पाहणी केली होती. परंतु केंद्राने अजूनही हवी तेवढी मदत केली नाही. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र सरकार दुष्काळी स्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्राला जनावरांच्या छावण्यांसाठी सरकार भरपूर मदत करीत आहे. परंतु मराठवाडा, विदर्भ व खानदेशाला आजपर्यंत केवळ १० कोटी दिले आहेत. दुष्काळाच्या प्रश्नी राज्यात असमतोल निर्माण करू नका, मागास विभागावर अन्याय करू नका, आता सहनशीलतेची परिसीमा पुरे झाली. सरकारने दुष्काळी स्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्यास रस्त्यावर येऊन संघर्ष केला जाईल, असा इशारा देताना सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज मुंडे यांनी व्यक्त केली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदाडे, जि. प. सभापती गणेश रोकडे, शहराध्यक्ष अजय गव्हाणे, अभय चाटे, शामसुंदर मुंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्यास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध होता. त्यामुळे राज व रामदास आठवले यांच्यात मतभेद आहेत, हे खासदार मुंडे यांनी उघड केले. राज यांनी मनसे शिवसेनेत विसर्जित करावी, या आठवले यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेवर आठवले यांची समजूत काढली जाईल, असेही त्यांनी सांगितले. उद्धव यांनी राजने सोबत यावे, असे एका मुलाखतीत सांगून पुढचे पाऊल टाकले आहे. राजने मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. तरीही आपण दोघे एकत्र येण्याबाबत प्रयत्न करीत राहू, अशीही ग्वाही मुंडे यांनी दिली.