शहरातील ४९ रस्त्यांच्या पाहणीत त्यातील १८ रस्त्यांवर अपुरा प्रकाश असल्याचे पालिकेनेच केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. यापूर्वी याच रस्त्यांवर दुसऱ्या संस्थेने केलेल्या पाहणीत ४० रस्त्यांवर अपुरा प्रकाश असल्याचे दिसून आले होते. पालिकेचा अहवाल ग्राह्य़ धरल्यासही किमान ४० टक्के रस्ते कमी प्रकाशाचे असून त्यावरील दिव्यांची व्यवस्था तातडीने बदलण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. तसेच संपूर्ण शहराच्या रस्त्यावरील प्रकाशाची माहिती घेऊन त्याबाबत श्वेतपत्रिकाही जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यांवर अपुरा प्रकाश पडत असल्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने अंधेरी येथील नगरसेवक अमित साटम यांनी गेल्या वर्षी उपोषण केले होते. त्यानंतर शहरातील १०७ रस्त्यांची पाहणी करण्यात आली. आयआयटीकडून या रस्त्यांची पाहणी केल्यावर अपुरा प्रकाश असल्याचे सिद्ध झाले होते. पालिकेने यापैकी ४९ रस्त्यांची पाहणी करून त्यापैकी केवळ १८ रस्त्यांवर अपुरा प्रकाश असल्याचे मान्य केले. आधीच्या पाहणीत या रस्त्यांपैकी ४५ रस्ते अपुऱ्या उजेडात होते.
मोजणीसाठी कालबाह्य यंत्रणा
रस्त्यांवरील प्रकाशव्यवस्था मोजण्यासाठी प्रमाणित पद्धत आहे. दोन दिव्यांमध्ये आठ ठिकाणी नोंद घेऊन त्यानंतर ही पातळी मोजली जाते. त्यामुळे दोन संस्थांच्या मोजणीत एवढा फरक येऊ शकत नाही. मात्र पालिकेचे अधिकारी स्वतची चूक मान्य करायला तयार नाहीत. एकीकडे गोवा, पिंपरी चिंचवडसारख्या शहरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिक प्रकाश देणारी व्यवस्था अंमलात आणली असताना मुंबईत मात्र पन्नास वर्षांपूर्वीची कालबाह्य़ यंत्रणा वापरली जात आहे, असा आरोप अमित साटम यांनी केला. पालिकेचा अहवालही ग्राह्य़ धरायचा ठरल्यास त्यानुसार ४० टक्के रस्त्यांवर अपुरा प्रकाश आहे. सर्वच शहरात अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेची समस्या असून याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. विशेष सभा बोलावून रस्त्यावरील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेची समस्या मार्गी लावावी असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिला.
पोलीस आयुक्तांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०१३ या काळात संध्याकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत २०७२ सोनसाखळी चोरी, ३८८ बलात्कार, १११९ विनयभंग आणि ६८८ छेडछाडीचे प्रकार नोंदवण्यात आले. रस्त्यावरील अपुऱ्या प्रकाशाचा फायदा घेऊन यातील अनेक गुन्हे घडले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर तातडीने योग्य प्रकारची प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.