मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी दवाखाने
सुरू केले, मात्र प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरातील बहुतांश पालिका दवाखानेच आजारी पडले आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करूनही दवाखान्यांमध्ये साधे बॅन्डेज, जखमेवर लावण्यात येणारे लाल औषध, कापूस आणि अन्य औषधांचा तुटवडा आहे. त्याचबरोबर अनेक दवाखान्यांमध्ये डॉक्टर मंडळी उन्हाळी सुटीवर असल्याने योग्य उपचारांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. व्रणोपचारक (बॅन्डेज करणारा कर्मचारी) किवा इतर कर्मचाऱ्यांना रुग्णांना औषध देण्याचे काम करावे लागते.
मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी ११२ दवाखाने
आणि १६८ आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. एक डॉक्टर, एक व्रणोपचारक, एक औषध निर्माता आणि एक कामगार असे चौघे जण या दवाखान्यात असतात. सकाळी ९ वाजता दवाखाना सुरू होतो आणि दुपारी १ ते १.३० दरम्यान दवाखाना बंद असतो. दुपारे २ ते ३ दरम्यान दवाखान्यात बाह्य़रुग्ण विभाग चालविला जातो. त्यानंतर रुग्णांचा अहवाल तयार करणे, जमा झालेल्या पैशांचा हिशोब करणे ही कामे केली जातात. काही दवाखान्यांमध्येच आरोग्य केंद्र असल्यामुळे तेथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होते. झोपडपट्टी परिसरातील पालिका दवाखान्यांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात, मात्र सध्या ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था या दवाखान्यांची झाली आहे.
मे महिन्यामध्ये अनेक दवाखान्यांमधील डॉक्टर, व्रणोपचारक, औषध निर्माता आणि
कामगार रजेवर गेले आहेत. त्यामुळे अनेक दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागते, तर काही वेळा व्रणोपचारक औषधे देऊन रुग्णांना वाटेला लावतो. काही वेळा डॉक्टर असतो तर व्रणोपचारक नसतो. अशा वेळी व्रणोपचारकाचे केसपेपर आणि औषध देण्याचे अथवा जखमेवर मलमपट्टी करण्याचे काम चक्क कामगार मंडळी कसेबसे उरकत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व कामांसाठी १० टक्केराखीव कर्मचारीवृंद सेवेत असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याच्या जागी राखीव कर्मचारी काम करू शकतील आणि त्यामुळे रुग्णांना उपचाराविना परतावे लागणार नाही.
दवाखान्यातील डॉक्टरांचे प्रती महिना वेतन लाखाच्या वर पोहोचले आहे. तसेच औषध
निर्मात्यास सुमारे ४५ हजार रुपये, व्रणोपचाराला २५,००० रुपये, तर कामगाराला २०,००० वेतन दिले जाते. तसेच येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधेही दिली जातात. इतका खर्च करूनही दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना मात्र चांगली सेवाच मिळत नाही. अनेक वेळा औषधे उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना औषधांच्या दुकानांतून औषधे घेण्यासाठी भाग पाडले जात आहे.