‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा पदार्पण करणाऱ्या श्रीदेवीला यशाची चव चाखायला तर मिळालीच. पण त्याचबरोबर ऐन चाळिशीतील ही अभिनेत्री थेट कतरिना, अनुष्का, दीपिका, प्रियांक अशा विशीतल्या अभिनेत्रींशी स्पर्धा करणार आहे. बिग स्टार एण्टरटेन्मेण्ट अॅवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यात ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटासाठी श्रीदेवीला ‘मोस्ट एण्टरटेनिंग अॅक्टर’ या विभागासाठी नामांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे तिच्याबरोबर नामांकन मिळालेल्या अभिनेत्रींमध्ये चक्क प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, दीपिका पडुकोण आणि विद्या बालन यांचा सहभाग आहे.
रुपेरी पडद्यावर ८० आणि ९० चे दशक गाजवणाऱ्या श्रीदेवीने ‘जुदाई’ या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीतून काही काळ विराम घेतला होता. या काळात तिने आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणे पसंत केले होते. मात्र तब्बल १५ वर्षांच्या विश्रांतीनंतर ती गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाद्वारे मोठय़ा पडद्यावर झळकली. या चित्रपटात तिने साकारलेल्या शशी गोडबोले या भूमिकेला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. तसेच बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने खूपच चांगली कामगिरी केली.
बिग स्टार एण्टरटेन्मेण्ट अॅवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटासाठी श्रीदेवीला ‘मोस्ट एण्टरटेनिंग अॅक्टर’ या विभागासाठी नामांकन मिळाले आहे. तिच्यासमोर प्रियांका चोप्रा (बर्फी), अनुष्का शर्मा (जब तक है जान), दीपिका पडुकोण (कॉकटेल) आणि विद्या बालन (कहानी) या चौघींचे आव्हान आहे. यातील विद्या बालन वगळता सर्वच अभिनेत्री त्यांच्या विशीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर नामांकन मिळवणे, हेदेखील श्रीदेवीसाठी कौतुकास्पद आहे, हे नक्की. आता ती हा पुरस्कार जिंकून इतिहास घडवणार का, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 3, 2012 11:51 am