सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी उशिरा सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साही आणि मंगलमय वातावरणात नंदीध्वजांचा ‘अक्षता सोहळा’ पार पडला. सुमारे साडेआठशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या या यात्रेत अक्षता सोहळा पार पडताच श्री सिद्धेश्वराच्या जयजयकाराने अवघे आसमंत दुमदुमून गेले.
सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा २.३०च्या सुमारास श्री सिद्धेश्वरमहाराजांच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर अक्षता सोहळय़ाला प्रारंभ झाला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे, कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह खास बाराबंदीचा पोशाख परिधान केलेले पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, आमदार विजय देशमुख, महापौर अलका राठोड, आमदार सिद्रामप्पा पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार दिलीप माने यांचा अक्षता सोहळय़ात प्रामुख्याने सहभाग होता. याशिवाय माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, तुळजापूरचे माजी आमदार सी. ना. आलुरे गुरुजी, शिवशरण पाटील, नरसिंग मेंगजी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापालिका सभागृह नेते महेश कोठे, स्थायी समितीचे सभापती विनायक कोंडय़ाल, माजी महापौर मनोहर सपाटे, नलिनी चंदेले, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांचीही या वेळी उपस्थिती होती. सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे अध्यक्ष रुद्रप्पा माळगे यांच्यासह देवस्थान पंच मंडळाचे सदस्य मल्लिकार्जुन वाकळे, अॅड. मिलिंद थोबडे, गुंडप्पा कारभारी, नंदकुमार मुस्तारे आदींनी अक्षता सोहळय़ाचे नेटके नियोजन केले होते.
बाराव्या शतकात ग्रामदैवत सिद्धरामेश्वरमहाराजांनी शहरात लोकसहभागातून तलावाची निर्मिती करुन त्यात गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, सरस्वती, भीमा आदी वीस नद्यांतून पाणी आणले होते. त्यांनी परिश्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. ते योगी होते. त्यांनी शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांसह अष्टविनायक व अष्टभैरवांची प्रतिष्ठापना केली होती. या योगी पुरुषावर मोहित झालेल्या एका कुंभारकन्येने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली होती. तिच्या इच्छेचा मान राखून श्री सिद्धरामेश्वरांनी आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. त्यानुसार सिद्धरामेश्वराच्या उपस्थितीत त्यांच्या योगदंडाशी कुंभारकन्येने विवाह केला व नंतर ती सती गेली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी श्री सिद्धेश्वर यात्रेत अक्षता सोहळय़ासह विवाह सोहळय़ातील सर्व विधी पार पाडण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे.
सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू वाडय़ातून मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक निघाली. पारंपरिक मार्गावरून मिरवणुकीने सर्व सात नंदीध्वज छत्र-चामरे व पालखीसह अक्षता सोहळय़ासाठी सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना संस्कार भारतीच्या कलावंत कार्यकर्त्यांनी सुमारे तीन किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर रंगीबेरंगी रांगोळय़ांच्या सुरेख पायघडय़ा घातल्या होत्या. यात गोपद्म, केंद्रवर्धिनी, शृंखला, सर्परेषा आदी मंगलचिन्हे रेखण्यात आली होती. गेल्या नऊ वर्षांपासून संस्कार भारतीचे कलावंत अक्षता सोहळय़ाच्या दिवशी नियमित रंगावली घालत आहेत. हलग्यांचे पथक, धनगरी वाद्य पथक, नाशिक ढोल, संगीत बॅन्ड पथक आदींच्या सहभागातून निघालेल्या या मिरवणुकीत जागोजागी भाविकांनी नंदीध्वजांना बाशिंग बांधून व खोबरे, खारीक, लिंबांच्या माळा घालून सश्रद्ध भावनेने पूजन केले. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळल्यामुळे ही मिरवणूक संमती कट्टय़ावर येण्यास दुपारचे अडीच वाजले.
संमती कट्टय़ावर नंदीध्वजांचे आगमन होण्यापूर्वी तेथे अक्षता सोहळा पाहण्यासाठी दुपारी १२ पासूनच भाविकांची गर्दी झाली होती. सर्वाना नंदीध्वजांच्या आगमनाची प्रचंड उत्सुकता होती. अधूनमधून ‘एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वरमहाराज की जय’चा उद्घोष होत होता. पूर्वापार परंपरेनुसार पांढराशुभ्र बाराबंदी पोशाख, फेटा व धोतर परिधान केलेल्या सिद्धेश्वर भक्तांच्या गर्दीने सिद्धेश्वर तलावाच्या किनारी संमती कट्टा परिसराला जणू ‘दूध सागरा’चे स्वरूप प्राप्त झाले होते.
वाजतगाजत नंदीध्वजांचे संमती कट्टय़ावर आगमन झाल्यानंतर श्री सिद्धेश्वराच्या योगदंडाच्या साक्षीने प्रमुख मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांनी प्रथम ‘सुगडी पूजन’ केले. त्यानंतर कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते मानाचा विडा देण्यात आला. मानकरी सुहास ऊर्फ तम्मा शेटे यांनी संमती मंगलाष्टक हिरेहब्बू यांच्या स्वाधीन केले व त्यानंतर हिरेहब्बू व देशमुख यांनी सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वी श्री सिद्धेश्वरमहाराजांनी स्वत: रचलेल्या संमती मंगलाष्टकांच्या प्रतीची विधिवत पूजा केली. सुहास ऊर्फ तम्मा शेटे यांनी संमती मंगलाष्टकांचे वाचन केले. मंगलाष्टकाच्या वेळी ‘सत्यम सत्यम’ हे शब्द उच्चारले जाताच उपस्थित लाखो भाविक नंदीध्वजांच्या दिशेने अक्षता टाकत होते. हा अक्षता सोहळा अर्धा तास चालला. या सुंदर अक्षता सोहळा ‘याची डोळा याची देही’ पाहताना अनेकांनी मोबाइल कॅमेऱ्याद्वारे अक्षता सोहळय़ातील दृश्ये टिपली. या अक्षता सोहळय़ाचे स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच आकाशवाणीवरूनही त्याचे प्रसारण केले गेले. अक्षता सोहळय़ानंतर नजीकच्या सिद्धेश्वर कन्या प्रशालेत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.