दरवर्षी गरजू रुग्णांना वैद्यकीय कारणास्तव तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे काम मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून अव्याहतपणे सुरू आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी न्यासाने नाशिक जिल्ह्य़ासाठी एक कोटीची आर्थिक मदत देऊन प्रथमच स्वत: अशा उपक्रमात प्रत्यक्षपणे सहभागी होण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील तीन गावे दत्तक घेण्यात येणार असून पदाधिकारी पाहणी करून कामाचे नियोजन, प्रगती व तत्सम बाबींचा आढावा घेणार असल्याचे न्यासाच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले. न्यासाच्या विश्वस्तांकडून बुधवारी एक कोटी रुपयांचा धनादेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी स्वीकारला. या वेळी न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र  राणे व विश्वस्त हरीश सनस यांनी उपरोक्त माहिती दिली.
राज्यातील पाणीटंचाई दूर करणे आणि टंचाई स्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग, खासगी उद्योग यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दरवर्षी पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा शासनाचा मानस आहे. या अभियानाला राज्यातील संस्थांनी निधी उपलब्ध करावा असे आवाहन शासनाने केले होते. त्यास मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने तात्काळ प्रतिसाद देऊन निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. प्रति जिल्हा एक कोटी रुपये याप्रमाणे राज्यातील ३४ जिल्ह्य़ांसाठी ३४ कोटी रुपयांची आर्थिक मदत न्यासकडून दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्य़ासाठी एक कोटीचा धनादेश सकाळी छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. या वेळी न्यासाचे अध्यक्ष राणे व विश्वस्त सनस उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त सिन्नर तालुक्यातील तीन गावे न्यास दत्तक घेणार आहे. उपरोक्त गावांची पाहणी करून टंचाई दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असे विश्वस्तांकडून सांगण्यात आले. एखाद्या कामात या पद्धतीने प्रत्यक्ष सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. नाशिक जिल्ह्य़ात जलयुक्त शिवार अभियानास मदत करण्यास सिद्धिविनायक न्यास, शिर्डी संस्थान आणि कोका कोला कंपनीने प्रतिसाद दिला आहे. न्यास एक कोटी तर कोका कोला कंपनीने एक कोटी ४० लाख रुपये या कामांवर खर्च करणार आहे. उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जिल्ह्य़ातील कामांसाठी ३६८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. एप्रिल ते जून या कालावधीत ५८ कोटी रुपये तर जूनपासून मार्चपर्यंत १०२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्या अंतर्गत सिमेंट बंधारे, शेततळे, वनीकरण व पाणलोट क्षेत्र विकासाची कामे केली जातील, असे त्यांनी नमूद केले.