मुंब्रा इमारत दुर्घटनेनंतर अधिकृत आणि अनधिकृत इमारतींविषयी बराच ऊहापोह सुरू असतानाच अनधिकृतपणे वस्ती करून राहणारे लोक शहर स्वच्छतेच्या संकल्पनेलाच कसा हरताळ फासतात, हे सिद्धेश्वर तलाव परिसराची होत असलेली वाताहत पाहिल्यावर जाणवते. एकीकडे महापालिका प्रशासन प्रक्रिया करून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहनपर पारितोषिके जाहीर करीत असताना दुसरीकडे अगदी महापालिका मुख्यालयालगत असणाऱ्या चंदनवाडी, पाटीलवाडी परिसरातील झोपडपट्टय़ांमधून ड्रेनेजचा मैला थेट नाल्यात सोडला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातही आश्चर्याची बाब ही की, परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली होती, तरीही शहरावासीयांचे आरोग्य धोक्यात घालणारा हा गलिच्छ प्रकार अद्याप सुरूच आहे. विशेष म्हणजे हजार वर्षांपूर्वीच्या धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरांवर नव्याने प्रकाशझोत टाकणारी ब्रह्मदेवाची वैशिष्टय़पूर्ण अप्रतिम मूर्ती ज्या तलावात सापडली, त्या सिद्धेश्वर तलावासही अनधिकृत बांधकामांनी वेढा घातला आहे.
महापालिका मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर पाटीलवाडी तसेच चंदनवाडी विभाग आहेत. या परिसरातील जमीनमालकांनी सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरणासाठी महापालिकेस जागाही देऊ केली होती. मात्र आता त्यापैकी बरीचशी जागा अतिक्रमणांनी वेढली आहे. तलावाभोवतीच्या झोपडपट्टय़ांचे सांडपाणी थेट तळ्यात सोडले जाते. ते वेळीच रोखले नाही, तर या सुंदर तळ्याचे मोठय़ा सांडपाण्याच्या डबक्यात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा स्पष्ट इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.  
चंदनवाडी-पाटीलवाडीच्या मागून सांडपाणी वाहून नेणारा नाला जातो. नाल्याभोवती असणाऱ्या झोपडपट्टय़ांमधून ड्रेनेजचे पाणी थेट नाल्यात सोडले जाते. त्यामुळे परिसरात सदैव दरुगधी येते आणि अधिकृतपणे राहणाऱ्या सोसायटीच्या रहिवाशांना दारे-खिडक्या बंद करून, नाक बंद करून राहवे लागते. पाटीलवाडी आणि चंदनवाडीस आता चोहूबाजूंनी अनधिकृत वस्त्यांनी वेढले आहे. या वस्त्यांमध्ये लग्न, बारसे आणि विविध सणांनिमित्त सदैव मोठय़ा आवाजात डीजे अथवा लाऊड स्पीकर्स दणाणून येथील शांतता धोक्यात आणत असतात.

सिद्धेश्वर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण
ठाणे हे तलावांचे शहर मानले जाते. पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर हिंदू देव-देवतांच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून त्या लपविण्यासाठी याच तलावांचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळेच तलावांमध्ये मूर्ती सापडतात. सिद्धेश्वर तलावात तर ब्रह्मदेवाची सहा फुटी मूर्ती सापडली आहे. सध्या हिंदू धर्मपरंपरेत ब्रह्मदेवाची पूजा निषिद्ध मानली जात असली तरी हजार वर्षांपूर्वी-शिलाहार काळात ती होत असावी, हे या मूर्तीवरून सिद्ध होते. तलावातील गाळ काढून उत्खनन केल्यास ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण ऐवज मिळू शकेल, असे मत ठाणे शहराच्या इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी व्यक्त केले आहे.